महाराष्ट्र

पुण्यात धक्कादायक घटना; लिफ्टच्या दरवाज्यात अडकला चिमुकलीचा हात, CCTV व्हिडिओ व्हायरल

सुदैवाने उपस्थित नागरिकांच्या तत्परतेमुळे काही मिनिटांतच चिमुकलीचा हात सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

किशोरी घायवट-उबाळे

लिफ्टमध्ये लहान मुलांकडे थोडे दुर्लक्षही किती धोकादायक ठरू शकते, याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील दिघी परिसरात समोर आला आहे. एका इमारतीत चिमुकलीचा हात लिफ्टच्या दरवाज्यात अडकल्याची घटना शनिवारी (दि.१४) समोर आली आहे. सुदैवाने उपस्थित नागरिकांच्या तत्परतेमुळे काही मिनिटांतच बाळाचा हात सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओनुसार ही घटना ७ मार्चला घडल्याचे समजते.

लिफ्ट बंद होत असताना बाळाने दरवाजावर ठेवला हात

व्हायरल व्हिडीओनुसार, एक महिला काही महिन्यांच्या बाळासह लिफ्टने वरच्या मजल्यावर जात होती. त्यावेळी लिफ्टमध्ये इतर काही महिला आणि काही पुरुषही उपस्थित होते. लिफ्टचा दरवाजा बंद होत असताना बाळाने नकळत दरवाजावर हात ठेवला. त्यावेळी बाळासोबत असलेल्या महिलेने चिमुकलीचा हात बाजूला केला.

लिफ्टचा दरवाजा बंद झाला अन्...

मात्र, काही क्षणानंतर चिमुकलीने पुन्हा एकदा दरवाजावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान लिफ्ट ठरलेल्या मजल्यावर पोहोचली आणि दरवाजा उघडला. त्यानंतर दरवाजा पुन्हा बंद होत असतानाच चिमुकलीचा हात दरवाजाच्या फटीत अडकला. हा प्रकार लक्षात येताच लिफ्टमधील सर्वजण घाबरले. एकीकडे बाळ वेदनेने रडत होते तर दुसरीकडे तिचा हात बाहेर काढण्यासाठी नागरिकांचे अथक प्रयत्न सुरु होते. मात्र सुरुवातीला हात सहज बाहेर आला नाही.

नागरिकांच्या प्रयत्नांमुळे टळला मोठा अपघात

काही मिनिटांच्या प्रयत्नांनंतर अखेर चिमुकलीचा हात सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश येते. या घटनेत चिमुकलीला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याने उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला. ही संपूर्ण घटना इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

लिफ्ट वापरताना मुलांकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन

दरम्यान, या घटनेनंतर लिफ्टचा वापर करताना विशेषतः लहान मुलांसोबत अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, मुलांना लिफ्टच्या दरवाज्याजवळ, बटणांजवळ किंवा कडेला उभे राहू देऊ नये. क्षणिक दुर्लक्षही मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकते, त्यामुळे पालकांनी मुलांसह लिफ्टचा वापर करताना विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

देशात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही; घाबरून इंधन साठवू नका, केंद्र सरकारचे नागरिकांना आवाहन

LPG सिलिंडर बुकिंग आता आणखी सोपं! व्हॉट्सॲप, मिस्ड कॉलपासून ॲपपर्यंत अनेक सुविधा उपलब्ध

मध्यपूर्वेतील संघर्षादरम्यान भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना दिलासा; ३० दिवसांची व्हिसा मुदतवाढ, ओव्हरस्टे दंडही माफ

मुंबईकरांनो सावधान, यंदा पावसाळ्यात समुद्राला उधाण; २४ दिवस समुद्रात उसळणार मोठ्या लाटा

Mumbai : लोकल प्रवाशांसाठी सूचना; उद्या 'या' रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, वाचा वेळापत्रक