पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी ऐनवेळी घेतलेल्या माघारीमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत संघर्ष आता विकोपाला गेला आहे. राष्ट्रवादीच्या या धक्कादायक निर्णयामुळे महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला असला, तरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस या दोन्ही मित्रपक्षांनी राष्ट्रवादीवर 'विश्वासघाता'चा गंभीर आरोप केला आहे. पुण्यात महाविकास आघाडी म्हणून काम करताना मित्रपक्षांना संपूर्णपणे अंधारात ठेवून केलेली ही 'सेटलमेंट' असल्याचा थेट आरोप करत, दोन्ही पक्षांनी आता स्थानिक पातळीवर आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे शहरप्रमुख वसंत मोरे यांनी राष्ट्रवादीच्या या भूमिकेवर जोरदार हल्ला चढवला. ही जागा राष्ट्रवादीने स्वतःच्या पक्षासाठी नाही, तर महाविकास आघाडी म्हणून प्रतिष्ठेची केली होती. असे असताना माघार घेताना मित्रपक्षांना का कळवले नाही? दुपारी उमेदवारी कोणाची हे अधिकृतपणे सांगता आणि माघार घेताना मात्र अंधारात ठेवता, हा कसला आघाडी धर्म? असा संतप्त सवाल वसंत मोरे यांनी उपस्थित केला.
विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी सुरुवातीला स्वतः फोन करून काँग्रेसचा पाठिंबा मागितला होता, मात्र माघार घेण्याच्या घडामोडी सुरू असताना त्यांनी फोन उचलणे बंद केले आणि उमेदवार श्रीकांत पाटील यांनीही आजतागायत आमच्याशी संपर्क साधला नाही, असा धक्कादायक खुलासा दीप्ती चवधरी यांनी केला. आम्हाला ही माघार घेतल्याचे थेट टीव्ही न्यूजवरून समजले, हे अत्यंत अनपेक्षित आणि क्लेशदायक आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
उमेदवार श्रीकांत पाटील यांनी 'घोडेबाजार' टाळण्यासाठी माघार घेतल्याचे स्पष्टीकरण दिले असले तरी, कालचे आणि आजचे त्यांचे विधान पूर्णपणे विसंगत असल्याची टीका चवधरी यांनी केली. संख्याबळाचे गणित पाहता आमचा उमेदवार निवडून येणे कठीण आहे याची आम्हाला जाणीव होती.
परंतु, तरीही लढत देऊन आम्हाला निवडणुकीच्या मैदानात आमचे राजकीय अस्तित्व दाखवायचे होते. मात्र, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी आम्हाला बिलकुल विश्वासात घेतले नाही आणि अंधारात ठेवून हा निर्णय घेतला, असा थेट आरोप त्यांनी केला.
'स्वबळा'चे संकेत
काँग्रेसने या संपूर्ण धक्कादायक प्रकरणाचा एक सविस्तर राजकीय अहवाल तयार केला असून तो प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवला जाणार असल्याचे दीप्ती चवधरी यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष देखील आपला अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवणार आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाविकास आघाडीत राहायचे की नाही, याचा अंतिम निर्णय आता दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेतृत्व घेणार आहे. मात्र, या घडामोडींमुळे मित्रपक्षांनी आता पुण्यात 'स्वबळा'वर लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे दोन्ही गट म्हणजे केवळ छापा आणि काटा आहेत. त्यांची ही अंतर्गत भाऊबंदकी आम्हा मित्रपक्षांना त्रासदायक ठरत आहे. ठाण्यातही राष्ट्रवादीने माघार घेतल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. पुण्यात आणि ठाण्यात महायुतीला पडद्यामागून मदत करून साताऱ्यात अभयसिंह जगताप यांच्यासाठी महायुतीकडून छुपा पाठिंबा घेतला जाणार आहे का?, असा संशयास्पद प्रश्न उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर 'सेटलमेंट' झाल्याची शंका येत आहे.वसंत मोरे, पुणे शहरप्रमुख उबाठा
महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली होती. आम्ही सर्वांनी आणि आमच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन आघाडीचा धर्म पाळत उमेदवाराच्या अर्जावर सूचक व अनुमोदक म्हणून सह्या केल्या होत्या. ही जागा कोणत्याही परिस्थितीत लढवण्याचे निश्चित झाले होते; परंतु माघार घेताना आम्हाला साधे विचारलेही गेले नाही.दीप्ती चवधरी, अध्यक्षा, काँग्रेस