पुणे : बालेवाडी-बाणेर परिसरातील मुळा नदीत मोठ्या प्रमाणावर झालेल्या मासेमृत्यूची संयुक्त वैज्ञानिक चौकशी करून नदीप्रदूषणाचे स्रोत तातडीने बंद करावेत, अशी मागणी शिवसेना नेत्या तथा महाराष्ट्र विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुळा नदीचे पाणी काळवंडलेले, दुर्गंधीयुक्त आणि काही ठिकाणी फेसाळ झाल्याचे निदर्शनास आले आहे. हिंजवडी, सूस व महाळुंगे परिसरातून येणाऱ्या ओढे-नाल्यांमधून प्रक्रिया न केलेले सांडपाणी व रसायनमिश्रित पाणी नदीत मिसळत असल्याच्या तक्रारी आहेत. फुटलेल्या मलवाहिन्या, नदीत टाकला जाणारा कचरा आणि अडलेला प्रवाह यामुळे परिस्थिती गंभीर झाल्याचे गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
माशांचा मृत्यू रासायनिक विषबाधेमुळे, सांडपाण्यामुळे पाण्यातील प्राणवायू कमी झाल्याने किंवा अन्य कारणामुळे झाला, हे निश्चित करण्यासाठी पाणी, गाळ आणि मृत माशांचे नमुने मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासावेत, अशी मागणी त्यांनी केली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वयाने प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका, पीएमआरडीए, जलसंपदा, आरोग्य आणि मत्स्यव्यवसाय विभागांचे संयुक्त पथक स्थापन करून तपासणी करावी. तसेच उद्योग, हॉटेल, व्यावसायिक आस्थापना व गृहनिर्माण संस्थांच्या ईटीपी-एसटीपीची अचानक तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्राथमिक अहवाल ७२ तासांत आणि अंतिम कृती अहवाल सात दिवसांत सार्वजनिक करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.