पुणे : दहीहंडीचा उत्सव संपल्यानंतर लोखंडी संरचना उतरवताना झालेल्या दुर्घटनेत ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील जुन्या सांगवी परिसरात शुक्रवारी (दि.०४) रात्री ही घटना घडली. विघ्नहर्ता मंडळाच्या दहीहंडी कार्यक्रमानंतर लोखंडी सांगाडा काढण्याचं काम सुरू असताना त्याचा जड भाग अचानक खाली कोसळला. या दुर्घटनेत सलमा सलाउद्दीन पठाण (४५) गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
सांगाडा उतरवताना घडली दुर्घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यानंतर शुक्रवारी रात्री तात्पुरती उभारलेली लोखंडी संरचना उतरवण्याचं काम सुरू होतं. याचवेळी संरचनेचा एक अवजड भाग अचानक खाली पडून सलमा पठाण यांच्या डोक्यावर आदळला. या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
मुलगा मंडळाशी संबंधित
सलमा पठाण यांचा मुलगा संबंधित दहीहंडी मंडळाशी जोडलेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दुर्घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.
कुटुंबीयांकडून तक्रार दाखल करण्यास नकार
पोलिसांच्या माहितीनुसार, पठाण यांच्या कुटुंबीयांनी आयोजकांविरोधात तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे. तसेच पोलिसांनी स्वतःहून गुन्हा नोंदवू नये, अशी विनंतीही कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, लोखंडी संरचना नेमकी कशामुळे कोसळली, याचा तपास सुरू आहे.
सार्वजनिक उत्सवांतील सुरक्षेचा प्रश्न
दहीहंडी, गणेशोत्सव यांसारख्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर तात्पुरत्या लोखंडी संरचना उभारल्या जातात. मात्र, त्या उभारताना तसेच कार्यक्रमानंतर उतरवताना सुरक्षेच्या नियमांचं पालन कितपत होतं, हा प्रश्न या दुर्घटनेनंतर पुन्हा उपस्थित झाला आहे.