महाराष्ट्र

Pune : महापालिका निवडणुकीसाठी मतदारांमध्ये उत्साह; १२ हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा पूर्णतः सज्ज आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीमुळे मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाने विशेष तयारी केली आहे.

Krantee V. Kale

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा पूर्णतः सज्ज आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीमुळे मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाने विशेष तयारी केली आहे.

पुणे महापालिकेच्या १६५ जागांपैकी दोन जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित १६३ नगरसेवकांच्या निवडीसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. शहरातील सुमारे ३५ लाख मतदार आपला कौल देणार आहेत. पुणे महापालिका हद्दीतील ४,०११ मतदान केंद्रांवर २५,८९९ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ४५४ क्षेत्रीय अधिकारी आणि ३२ नोडल अधिकारी तैनात राहणार आहेत.

शहरातील सत्तेसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात मुख्य त्रिकोणी लढत पाहायला मिळत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ३२ प्रभागांमधील एकूण १२८ जागांपैकी १२६ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. प्रभाग क्रमांक ६ आणि १० मधून भाजपचे रवी लांडगे आणि सुप्रिया चांदगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित जागांसाठी अटीतटीची लढत रंगणार आहे.

शहरात एकूण १७,१३,८९१ मतदार असून त्यात ९,०४,८१५ पुरुष, ८,०७,१३९ महिला आणि १९७ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मतदानासाठी ६,५०० बॅलेट युनिट आणि २,०६७ कंट्रोल युनिट सज्ज ठेवण्यात आले आहेत.

९० संवेदनशील मतदान केंद्र

निवडणूक शांततेत, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी, यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुणे शहरात १२,००० पोलीस कर्मचारी, १४ उपायुक्त, ३० सहाय्यक आयुक्त आणि ७२३ सहाय्यक पोलीस निरीक्षक तैनात आहेत. याशिवाय ३,२५० होमगार्ड आणि SRPF च्या ४ तुकड्या पाचारण करण्यात आल्या आहेत. शहरातील ९० संवेदनशील मतदान केंद्रांवर ‘शीघ्र कृती दल’ आणि ‘स्ट्रायकिंग फोर्स’ गस्त घालणार आहेत.

शुक्रवारी मतमोजणी

मतदान प्रक्रिया संपल्यानंतर शुक्रवार, १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ८ ठिकाणी, तर पुण्यात निश्चित केंद्रांवर मतमोजणी पार पडेल. दुपारी १२ वाजेपर्यंत निकालाचे पहिले कल हाती येण्याची शक्यता आहे.

दुबार मतदारांवर नियंत्रण

प्रशासनाने शहरात ९२ हजार दुबार मतदार शोधून काढले असून, त्यांनी एकाच ठिकाणी मतदान करावे यासाठी विशेष अर्ज भरून घेण्यात आले आहेत. गैरप्रकार टाळण्यासाठी दुसऱ्या मतदान केंद्रावर ‘मतदान केले’ असा शिक्का मारण्याची खबरदारी घेतली जाणार आहे.

मतदारांसाठी विशेष सुविधा

मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, व्हीलचेअर, प्रतीक्षा कक्ष आणि वैद्यकीय पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. मतदान केंद्रात मोबाईल फोन नेण्यास बंदी असल्याने मतदारांचे फोन सुरक्षित ठेवण्यासाठी अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार ओळखपत्र नसल्यास आधार कार्ड, पासपोर्ट, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड, मनरेगा जॉब कार्ड यांसह १२ प्रकारच्या अधिकृत ओळखपत्रांद्वारे मतदान करता येणार आहे.

BMC Election : आज मतदान; मुंबईच केंद्रस्थानी; बोटावर उमटणार लोकशाहीचा ठसा, तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण

मतदानानंतर लगेच पुसली जाते बोटावरची शाई; मनसेच्या महिला उमेदवाराचा दावा; काँग्रेसच्या सचिन सावंतांनी तर प्रात्यक्षिकच दाखवलं - Video

BMC Elections 2026: 'व्होटर स्लिप्स'चा गोंधळ; अनेक मतदार मतदान न करताच परतले

Thane Election : व्होटर स्लिपमध्ये घोळ; नाव, अनुक्रमांक बरोबर; पत्ते मात्र बदलले

BMC Elections 2026: मुंबईत मतदानाला झाली सुरूवात; आज काय सुरू, काय बंद?