पुणे : कोथरूड पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी चौकशीच्या नावाखाली तीन तरुणींचा मानसिक. शारीरिक छळ केल्याचा आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथून पतीच्या छळाला कंटाळून पुण्यात आलेल्या एका २३ वर्षीय महिलेला एक रात्र आश्रय दिल्याच्या कारणावरून या तरुणींना लक्ष्य करण्यात आले.
पीडित तरुणींच्या म्हणण्यानुसार, महिलेचा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी असलेला सासरा राजकीय दबाव आणि पोलीस यंत्रणा वापरून थेट कोथरूडमध्ये पोहोचला आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत तीन तरुणींच्या खोलीवर छापा टाकण्यात आला. कोणतेही वॉरंट नसताना त्यांच्या खोलीत जबरदस्तीने घुसून मोबाईल तपासणी, कपड्यांची आणि अंतर्वस्त्रांचीही झडती घेण्यात आली. त्यानंतर त्या तिघींना पोलीस ठाण्यात पाच तास जबरदस्तीने चौकशीसाठी बसवून ठेवण्यात आले.
या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) अमोल कामटे, पोलीस शिपाई संजीवनी शिंदे आणि कोथरूड पोलीस ठाण्याच्या पीएसआय प्रेमा पाटील यांनी अश्लील आणि जातीवाचक शेरेबाजी केल्याचा आरोप आहे. "तुमच्या रूमवर मुले येतात का?", "लेस्बियन आहात का?", "तुमचे कॅरेक्टर सर्टिफिकेट कोणीही देणार नाही" असे अवमानकारक शब्द वापरले गेले असल्याचे पीडित तरुणींनी सांगितले.
या धक्कादायक घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर, तसेच सामाजिक कार्यकर्ते पोलीस आयुक्तालयात उपस्थित राहिले. त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, परंतु पोलीस प्रशासनाने अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. त्याबाबत लेखी उत्तरही पोलिसांकडून देण्यात आले आहे. परंतु मुलींनी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्यासमोरच संबंधित लेखी कागद फाडून नेमका कोणता गुन्हा दाखल करता येणार नाही असे लिहून द्या, अशी मागणी केली. पोलिसांनी अट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही, असे सांगितल्यावर आंदोलन संपुष्टात आले. दरम्यान, या घटनेमुळे तीनही तरुणींना घरमालकांनी खोली रिकामी करण्यास सांगितले आहे. पीडित तरुणींनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.
काय आहे नेमका प्रकार?
सासरच्या छळामुळे छत्रपती संभाजीनगरमधील एक महिला पुण्यात आली होती. मैत्रिणीने तिला मदत केली. संबंधित महिला कोथरूडमधील तीन युवतींच्या सदनिकेत राहायला आली. युवतीने छत्रपती संभाजीनगरमधील महिलेला मदत केली. त्यानंतर महिलेच्या सासरकडील नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडे दिली. महिलेचा शोध घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील पोलिसांचे पथक पुण्यात दाखल झाले. तांत्रिक तपासात संबंधित महिला कोथरूड भागात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक कोथरूडमधील सदनिकेत पोहोचले. त्यावेळी छत्रपती संभाजीनगरमधील महिला दुसरीकडे गेली होती. पोलिसांनी तीन युवतींकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. चैाकशी करताना छत्रपती संभाजीनगरमधील पोलिसांचे पथक सदनिकेत शिरले. तपासणीच्या नावाखाली कपाटातील कपडे, सामान फेकून देण्यात आले. जातीचा उल्लेख करून अपमान केल्याचे युवतींनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच संभाजीनगर येथील महिलेच्या पतीचे पहिले लग्न झाले असताना देखील त्याने बेकायदेशीर दुसरे लग्न करून त्रास दिल्याचा आरोप केला.
काय आहे पोलिस अधिकाऱ्यांवर आरोप?
कोथरुड पोलिस ठाण्यातील पीएसआय प्रेमा पाटील या मुलींना म्हणाल्या की, 'तुम्ही महार-मांगाचे ना, मग तुम्ही असेच वागणार आहे, तुम्ही वाया जाणार आहात. तुमची जात अशीच आहे, तू किती पोरांसोबत झोपलीस, तू रांड आहेस, असे प्रेमा पाटील यांनी म्हटल्याचा आरोप आहे. छत्रपती संभाजीनगरचे पीएसआय कामटे यांनीही मुलींशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप आहे. एका मुलीने पोलिसांना उत्तर द्यायचा प्रयत्न केल्यावर पीएसआय कामटे संतापले. या मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कामटे यांनी मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. तुमच्या दोन्ही मैत्रिणींचे स्कार्फ सेम आहेत, मग तुम्ही लेस्बियन आहात का? तुम्ही दोघीही दिसताही तशाच. तुम्ही किती तोकडे कपडे घालता. तुम्ही रां# आहात का? तुम्ही दारु पीत भटकत असाल. तुला बाप नाही तर तुला तर सोडूनच दिले असेल, असे कामटे यांनी म्हटल्याचा आरोप आहे.
ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकत नाही
पोलीस उपायुक्त संभाजी पाटील म्हणाले, आंदोलन करणाऱ्या तरुणीची जी तक्रार आहे, त्यानुसार तीन पोलीस अधिकारी यांच्यावर ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी आहे. वस्तुस्थिती पाहता पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ केली नसल्याने ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे आढळले. प्रथमदर्शनी घडलेली घटना हे वस्तुस्थितीवर आधारित नसून प्रथमदर्शनी यामध्ये तथ्य दिसून येत नसल्यामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा १९८९ अंतर्गत दखलपात्र गुन्हा होत नाही.
रोहित पवार, वडेट्टीवार यांची टीका
पुण्यातील कोथरूड पोलिसांनी ३ दलित तरुणींचा केलेल्या छळाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याप्रकरणी पोलिसांवर विविध प्रश्नांची सरबत्ती करत त्यांच्या कर्तव्य परायणतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विशेषतः माजी पोलिस अधिकारी तथा पोलिस नसलेल्या व्यक्ती या तरुणींच्या घरी चौकशीसाठी का गेल्या? असा संतप्त सवाल यांनी याप्रकरणी उपस्थित केला आहे.