छाया सौ : स्पेशल अरेंजमेंट
महाराष्ट्र

पुण्यात आणखी एक भूखंड घोटाळा; ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या १५ एकर जमिनीची परस्पर विक्री, सहदुय्यम निबंधक निलंबित

पुण्याजवळ ताथवडे येथील शासकीय मालकीच्या जमिनीची खरेदी-विक्री करताना नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे येथील हवेली सहदुय्यम निबंधक कार्यालयातील प्रभारी सहदुय्यम निबंधक विद्या शंकर बडे (सांगळे) यांना निलंबित करण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नोंदणी महानिरीक्षकाना याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले.

Swapnil S

मुंबई : पुण्याजवळ ताथवडे येथील शासकीय मालकीच्या जमिनीची खरेदी-विक्री करताना नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे येथील हवेली सहदुय्यम निबंधक कार्यालयातील प्रभारी सहदुय्यम निबंधक विद्या शंकर बडे (सांगळे) यांना निलंबित करण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नोंदणी महानिरीक्षकाना याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले.

पार्थ पवार यांच्या कथित भूखंड घोटाळ्यामुळे राज्यातील राजकारण तापले असताना आता पुण्यात आणखी एक घोटाळा समोर आला आहे. त्यात पिंपरी चिंचवडच्या ताथवडे येथील शासनाच्या तब्बल १५ एकर जमिनीची कोट्यवधी रुपयांना परस्पर विक्री करण्यात आली आहे. याप्रकरणी हवेलीच्या सहाय्यक दुय्यम निबंधकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

पुण्याजवळील मौजे ताथवडे, ता. मुळशी येथील सर्व्हे क्र. २० मधील एकूण ६ हे ३२ आर जमिनीच्या खरेदीखत दस्त क्र. ६८५/२०२५ च्या नोंदणीत ही अनियमितता आढळली. या जमिनीवर पशुसंवर्धन आयुक्तांचा ताबा असून, शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय खरेदी-विक्रीस बंदी असलेली मालमत्ता आहे. दस्तनोंदणीच्या वेळी, बडे यांनी अद्ययावत किंवा नजिकच्या कालावधीतील सातबारा उतारा जोडण्याची बाब दुर्लक्षित केली. त्यांनी जुना सातबारा स्वीकारला. जर त्यांनी दस्त नोंदणीच्या तारखेस लागू असलेला सातबारा तपासला असता, तर त्यावर 'शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय खरेदी-विक्रीस बंदी' हा प्रतिबंधात्मक शेरा दिसला असता आणि दस्त नोंदणी नाकारता आली असती.

उताऱ्यावरील मालक मयत असताना आणि वारसांची नोंद नसतानाही, तांत्रिक अडचणीचे कारण देत 'स्किप' पर्याय वापरून दस्त नोंदणी पूर्ण करण्यात आली. यासाठी त्यांनी वरिष्ठांची कोणतीही परवानगी घेतली नाही, याशिवाय काही अनियमितता करून व्यवहार करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आल्याचे नोंदणी महानिरीक्षकांनी म्हटले आहे.

पशुसंवर्धन विभागाला अंधारात ठेवून विक्री

पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे परिसरात पशुसंवर्धन विभागाची सर्व्हे नंबर २० येथे १५ एकर जागा आहे. या जागेची कोट्यवधी रुपयांत पशुसंवर्धन विभागाला अंधारात ठेवून परस्पर विक्री करण्यात आली. हा व्यवहार हेरंब गुपचुप या व्यक्तीने जानेवारी २०२५ मध्ये केला. मुद्रांक शुल्क विभागाने त्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला दिली. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांनी त्याची तक्रार पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे केली. त्यानुसार आता पुण्याचे विभागीय आयुक्त व पशुसंवर्धन विभाग या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Bihar Election Results 2025 Live Updates: "असे ट्रेंड बदलताना अन् पलटतानाही बघितलेत; ६५ ते ७० पेक्षा जास्त जागांवर...": RJD खासदार मनोज झा नेमकं काय म्हणाले?

पत्नीला साडेतीन लाखांची भरपाई देण्याचे आदेश; आर्थिक स्थितीची चुकीची माहिती देणाऱ्या पतीला न्यायालयाचा दणका

Mumbai : आयुक्तांच्या OSD विरोधात शड्डू; मुंबई पालिका सहाय्यक आयुक्तांचे थेट आयुक्तांनाच पत्र

BMC : पालिका परिमंडळीय स्तरावर वारसाहक्क मंजुरी समिती; प्रलंबित प्रकरणे लवकर मार्गी लागणार

Delhi car blast: दहशतवाद्यांना बाबरीचा बदला घ्यायचा होता; देशभरात ३२ कारमध्ये स्फोट घडवण्याचा होता कट; तपासातून माहिती उघड