मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या माध्यमातून विविध घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. पुणे शिरुर ते छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील रस्त्यांची ५० किमीने वाढ करण्यात येणार आहे. ग्रीन फिल्ड द्रुतगती मार्ग अंतर्गत हे काम करण्यात येणार असून यामुळे शिरुर ते छत्रपती संभाजी नगर द्रुतगती मार्गावरील वाहतूककोंडी फुटणार आहे. या प्रकल्पासाठी १४ हजार ८८६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत वादामुळे एमएमआरडीसी ऐवजी एमएसआयडीसी मार्फत बीओटीच्या धर्तीवर या मार्गाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
राज्यातील प्रमुख शहरांमधील वाहतूककोंडी फोडण्यासाठी रस्ते मार्गाचा विस्तार करण्यावर भर देण्यात आला आहे. समृध्दी महामार्गाप्रमाणेच पुण्यातील शिरूर ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत सुमारे २०५ किलोमीटर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग तयार करण्यात येणार आहे. महामार्ग उभारणीसाठी २ हजार ६३३ हेक्टर जमीन संपादन करण्यात आली आहे. याकरिता १४ हजार ८८६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बीओटीच्या धर्तीवर हे काम करण्यात येणार आहे. एमएमआरडीसी अंतर्गत या महामार्गाचे काम यापूर्वी करण्याचे विचाराधीन होते. मात्र भाजप आणि शिवसेनेतील छुप्या अंतर्गत वादामुळे एमएसआयडीसीमार्फत करण्यात येणार आहे.