प्रातिनिधिक छायाचित्र  
महाराष्ट्र

विसर्जन मिरवणुकीचा तिढा सुटणार; पुण्यातील गणेश मंडळांची पोलिसांच्या बैठकीत एकजुटीची भूमिका

वैभवशाली गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याच्या वेळेवरून निर्माण झालेला वाद सामोपचाराने सोडवला जाईल, असा एकमुखी निर्णय पुण्यातील मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जाहीर केला.

Swapnil S

पुणे : वैभवशाली गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याच्या वेळेवरून निर्माण झालेला वाद सामोपचाराने सोडवला जाईल, असा एकमुखी निर्णय पुण्यातील मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जाहीर केला. यावर तोडगा काढण्यासाठी सर्व प्रमुख मंडळांची लवकरच एक संयुक्त बैठक आयोजित केली जाणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती, त्यावेळी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

यंदा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ आणि अखिल मंडई मंडळाने, मानाच्या पाच मंडळांची मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर बेलबाग चौकातून मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानंतर विसर्जन मिरवणुकीतील सहभागाच्या वेळेवरून विविध मंडळांमध्ये मतमतांतरे निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात दोन बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले की, "पोलिसांच्या दृष्टीने सर्व मंडळे सारखीच आहेत. मिरवणुकीतील क्रमांकाबाबत पोलीस स्वतःहून कोणताही निर्णय घेणार नाहीत. जी परंपरा आहे, ती अबाधित राहावी, यासाठी सर्व गणेश मंडळांनी एकत्र बसून विसर्जन मिरवणुकीबाबत निर्णय घ्यावा."

यावर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे उत्सव प्रमुख पुनीत बालन आणि अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मानाची मंडळे यंदा ढोल-ताशा पथकांची संख्या कमी करणार असल्याने दुपारी दोनपर्यंत बेलबाग चौक पार करतील अशी अपेक्षा आहे. आम्ही त्यानंतर लगेच मिरवणुकीत सहभागी होऊ. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची मिरवणूक दुपारी चार वाजता सुरू होणार असल्याने, मध्ये पुरेसा अवधी आहे आणि कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.

अखेरीस, सर्व मंडळांनी सामंजस्याची भूमिका घेतली. श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे म्हणाले, मंडळांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. विसर्जन मिरवणुकीवर चर्चा करण्यासाठी येत्या दोन दिवसांत सर्व प्रमुख मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली जाईल आणि त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे, ही सर्व मंडळांची प्रमुख भूमिका आहे. या बैठकीला पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी, श्री गुरुजी तालीम, श्री तुळशीबाग, केसरी गणेशोत्सव, श्रीमंत दगडूशेठ हलवाई, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, अखिल मंडई मंडळ आणि इतर प्रमुख मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

'एक मंडळ, एक ढोल पथक'

बैठकीत विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्याही मांडल्या. वेळेची बचत करण्यासाठी 'एक मंडळ, एक ढोल पथक' हा नियम सर्वांना समान लागू करावा, मानाच्या मंडळांसाठी पोलिसांनी इतर रस्त्यांवरील मंडळांची अडवणूक करू नये आणि विसर्जन मिरवणुकीला सकाळी सात वाजता परवानगी द्यावी, अशी मागणी काही मंडळांनी केली.

Delhi Protest : अभिजीत दिपकेंना आज न्यायालयात हजर करणार; AISA च्या नेहा बोरा यांची सुटका

Mumbai : दसरा मेळाव्यासाठी दादरमधील वाहतुकीत मोठे बदल! २० ऑक्टोबरला 'हे' रस्ते बंद; पर्यायी मार्ग, पार्किंगची व्यवस्था जाणून घ्या

Mumbai : कफ परेड मरिना प्रकल्पाला स्थगिती; MMRDA च्या मंजुरीची एमसीझेडएमएची मागणी

नांदेड जिल्ह्यात तीन महिन्यांत ३५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; पावसाअभावी शेतकरी हवालदिल, खरीप हंगाम हातातून गेल्याने नैराश्य

भाईंदरमध्ये महापालिकेत पत्रकारांना धक्काबुक्की; भाजप नगरसेवकांवर मारहाणीचे आरोप, पत्रकारांचे आंदोलन