मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधातील मानहानीच्या खटल्यात साक्षीदाराला समन्स बजावण्यास नकार देणाऱ्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाला शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शेवाळे यांनी ॲड. चित्रा साळुंखे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.
रेकॉर्डवर आणण्यासाठी मागितलेली कागदपत्रे ही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात तक्रारदाराचा खटला सिद्ध करण्यासाठी सर्वोत्तम पुरावा होती, असा दावा राहुल शेवाळे यांनी केला आहे. त्यांची याचिका सुनावणीसाठी निश्चित करण्यात आली होती. मात्र वेळेअभावी सुनावणी झाली नाही. त्यानंतर सुनावणी पुढील महिन्यापर्यंत तहकूब करण्यात आली.
असे आहे प्रकरण
शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मध्ये २९ डिसेंबर २०२२ रोजी कराची येथील कथित रिअल इस्टेट व्यवहारांशी संबंधित बातमी प्रकाशित झाल्यानंतर शेवाळे यांनी फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला आहे. शेवाळे यांनी 'सामना'चे मुख्य संपादक असलेल्या उद्धव ठाकरे आणि 'सामना'चे कार्यकारी संपादक असलेल्या राऊत यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे.