महाराष्ट्र

रायगडची आरोग्य व्यवस्था 'व्हेंटिलेटर'वर; वरिष्ठ पदे रिक्त, रुग्णसेवेवर गंभीर परिणाम

रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची अवस्था अत्यंत चिंताजनक बनली असून, महत्त्वाची वरिष्ठ पदे दीर्घकाळापासून रिक्त असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांवर मोठा परिणाम होत आहे.

Swapnil S

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची अवस्था अत्यंत चिंताजनक बनली असून, महत्त्वाची वरिष्ठ पदे दीर्घकाळापासून रिक्त असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांवर मोठा परिणाम होत आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा कणा मानली जाणारी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी ही महत्त्वाची पदे सध्या रिक्त आहेत. या पदांचा तात्पुरता अतिरिक्त कार्यभार संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला असून, त्यामुळे प्रशासनावर ताण वाढला आहे.

सध्या जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा कार्यभार डॉ. निशिकांत पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. तर जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी या दोन्ही पदांचा पदभार सहाय्यक संचालक (कुष्ठरोग निर्मूलन) डॉ. प्राची नेहुलकर यांच्याकडे आहे.

दरम्यान, नियमित जिल्हा शल्य चिकित्सक पदावर असलेल्या अधिकाऱ्यांची अन्यत्र नियुक्ती झाल्यानंतरही त्या जागी नवीन नियुक्ती करण्यात आलेली नाही. तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे वेतन अद्याप रायगड जिल्ह्यातूनच दिले जात असल्याची माहिती समोर येत असून, या बाबीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अभावामुळे निर्णयप्रक्रियेत विलंब होत असून, त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. तात्पुरत्या पदभारामुळे प्रशासकीय कामकाजावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर, रिक्त पदांवर तत्काळ नियमित नियुक्त्या करणे, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करणे आणि जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.

रायगडची आरोग्य व्यवस्था सध्या ‘आयसीयू’मध्ये असल्याची भावना व्यक्त होत असून, आता प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

'लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र या'; SIR विरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास

यवतमाळमध्ये वेल्डिंग करताना भीषण स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, Video

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक; खिडक्यांच्या काचा फुटल्या, Video व्हायरल