लासलगाव : कांद्याच्या रेल्वे वाहतुकीत २९ टक्क्यांपर्यंत कपात! रेल्वे बोर्डाच्या निर्णयाचे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून स्वागत 
महाराष्ट्र

लासलगाव : कांद्याच्या रेल्वे वाहतुकीत २९ टक्क्यांपर्यंत कपात! रेल्वे बोर्डाच्या निर्णयाचे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून स्वागत

कांद्याच्या रेल्वे वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या बंदिस्त मालवाहू व एअर ब्रेक प्रणाली असलेल्या बंदिस्त मालवाहू डब्यांची अनुमत वहन क्षमता ४५ टन निश्चित करण्याचा निर्णय भारतीय रेल्वे बोर्डाने घेतला आहे.

Swapnil S

लासलगाव : कांद्याच्या रेल्वे वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या बंदिस्त मालवाहू व एअर ब्रेक प्रणाली असलेल्या बंदिस्त मालवाहू डब्यांची अनुमत वहन क्षमता ४५ टन निश्चित करण्याचा निर्णय भारतीय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. या निर्णयामुळे कांद्याच्या रेल्वे वाहतूक भाड्यात सुमारे २९ टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शक्यता असून, कांदा व्यापारी, निर्यातदार आणि उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

रेल्वे बोर्डाने २३ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील सुधारित आदेश जारी केला असून, २८ ऑक्टोबरपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ही सुधारित व्यवस्था २७ ऑक्टोबर २०२७ पर्यंत लागू राहणार आहे.

यापूर्वी कांदा वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या एका प्रकारच्या बंदिस्त वॅगनची अनुमत वहन क्षमता ५९.८ ते ६१.४ टन, तर एअर ब्रेक प्रणाली असलेल्या बंदिस्त वॅगनची क्षमता ६२.४ ते ६४ टन इतकी होती. आता या दोन्ही प्रकारच्या वॅगनची अनुमत वहन क्षमता ४५ टन निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय एक टन अतिरिक्त भार सहनशीलतेची तरतूदही करण्यात आली आहे. त्यामुळे कांद्याच्या वाहतुकीसाठी आकारण्यात येणाऱ्या भाड्यात सुमारे २९ टक्क्यांपर्यंत कपात होण्याची अपेक्षा आहे.

कांदा उत्पादकांनाही निर्णयाचा फायदा

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत आणि मनमाड यांसारख्या प्रमुख बाजारपेठांतून देशांतर्गत तसेच परदेशातील बाजारपेठांमध्ये रेल्वेद्वारे कांद्याची वाहतूक केली जाते. अशा परिस्थितीत रेल्वे वाहतूक भाड्यात होणारी कपात व्यापार आणि निर्यात क्षेत्रासाठी महत्त्वाची ठरणार आहे. वाहतुकीचा खर्च कमी झाल्यास कांद्याच्या बाजारपेठेतील स्पर्धात्मक क्षमतेलाही मदत होऊ शकते.

निर्णयाचे स्वागत

रेल्वे वाहतूक भाड्यात सुमारे २९ टक्क्यांपर्यंत कपात होण्याच्या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे कांदा व्यापार आणि निर्यात क्षेत्राला आर्थिक दिलासा मिळेल. रेल्वे बोर्डाच्या या निर्णयामुळे कांदा वाहतुकीचा खर्च कमी होऊन व्यापारी आणि निर्यातदारांना दिलासा मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारपेठेत अधिक चांगला दर मिळण्यास अप्रत्यक्ष मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आता दर ४ मिनिटे २५ सेकंदांनी मेट्रो; मुंबई मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये वाढ

राष्ट्रवादी अजित पवार गटात नाराजीचा स्फोट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात तक्रारीचा सूर, देवगिरीवर आमदारांची बैठक

अनिल अंबानी समूहाप्रकरणी ED ची माेठी कारवाई; ५१० कोटींच्या संपत्तीवर टाच

Mumbai : नुकसानभरपाई मालक व भाडेकरूमध्ये समान वाटून घ्या! सिद्धिविनायक मंदिर जमीन भरपाईप्रकरणी आदेश

...तर निवडणुका घ्यायच्याच कशाला? 'गोकुळ' अध्यक्ष निवडीवरून सतेज पाटलांचा संताप