मुंबई : जगभरात सध्या भीषण परिस्थिती आहे. सध्या सगळीकडे धाकधूक आहे. लोकांना अन्न शिजवायला गॅस मिळत नाही. खरे तर काही गोष्टी आपल्याकडून राहून गेल्या. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राहून गेल्या. इराण इतकी वर्षे आपल्याला साथ देत होता. त्या इराणवरती जे हल्ले होत आहेत, त्यामध्ये आपण इराणला साथ द्यायला हवी होती. भविष्यात या सर्व गोष्टींचा फटका भारताला बसणार आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवतीर्थावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची तोफ धडाडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत राज्यातील विकासाचा बोजवारा, नोकऱ्यांचा प्रश्न आणि वाहतूक कोंडीवरून सरकारला धारेवर धरले.
आंतरराष्ट्रीय घडामोडींवर राज ठाकरे म्हणाले की, “देशामध्ये येणारे बरेचसे तेल इराणहून येते. ते आपल्याला तेल रुपयात देतात. खामेनी गेल्यानंतरही आपल्या पंतप्रधानांनी कुठलेही निषेधाचे एकही निवेदन काढले नाही. हल्ल्यावरही कुठले निवेदन दिले नाही, इराणला पाठिंबा न देणे ही मोठी चूक असून, त्याचे गंभीर परिणाम भविष्यात देशाला भोगावे लागतील.”
राज्यात भीषण परिस्थिती
“राज्यात शेतकरी दररोज आत्महत्या करत आहे, परिस्थिती गंभीर आहे. परंतु, आपण हे सर्व फक्त पाहतोय आणि केवळ मोबाईलवर व्यक्त होतोय. आपण आभासी जगतात अडकलो आहोत. मैदानात उतरून संघर्ष करण्याऐवजी तरुण पिढी केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित राहिली आहे. कोस्टल रोड बांधला गेलाय खरा, पण तो तुमच्या सोयीसाठी झालेला रस्ता नाही. तो इतरांना मुंबईत सहज येण्यासाठी आणि तुम्हाला मुंबईच्या बाहेर काढण्यासाठीचा मार्ग आहे. आपले संपूर्ण राज्य कर्जाच्या विळख्यात अडकले आहे. तुम्ही राज्यातील कोणत्याही शहरात जा, तिथे ना कसला आकार उरला आहे ना उकार आहे. शहरांची दुरवस्था झाली आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.