भाईंदर : जर आमच्यावर पहिली ते पाचवीपर्यंत जबरदस्तीने हिंदी लादल्यास दुकानच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील शाळा बंद करू, तुम्ही हिंदी सक्ती करून तर बघा, असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी मीरा-भाईंदर येथील सभेत बोलताना दिला.
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची मीरा-भाईंदर येथे शुक्रवारी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना त्यांनी हिंदी सक्तीवरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले की, भाषा आणि पायाखालची जमीन गेली तर मराठी माणसाला कोणीही विचारणार नाही. आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही यासाठी आमच्यावर हिंदी लादू नका, देशात हिंदी कोणाचीच मातृभाषा नाही, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, बाहेरील अनेक व्यापारी महाराष्ट्रात राहतात. त्यांनी येथे राहावे पण शांत राहा. मराठी शिका, जर तुम्ही मस्ती कराल तर दणका बसणार, म्हणजे बसणार हे लक्षात ठेवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हिंदी भाषा सक्तीची करणार म्हणजे करणार, असे ठामपणे सांगत होते. राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर त्यांनी खुशाल करावी, पण महाराष्ट्रात हिंदीची सक्ती होऊ देणार नाही. त्यासाठी दुकानेच काय तर शाळाही बंद केल्या जातील, असा इशारा त्यांनी दिला.
महाराष्ट्रात जर बाहेरील लोकांना मराठी कानावर ऐकू येत नसेल तर कानावर मारून ऐकवू. व्यापारी म्हणताहेत की, दुकाने बंद ठेवू तर आम्ही मराठी लोकांनी विकत नाही घेतलं तर तुमचं कसं चालणार आहे. हिंदी भाषा शिकली पाहिजे, मात्र त्याची सक्ती नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, तिसरी भाषा करणार म्हणजे करणार. नुसत्या मोर्चाच्या धसक्याने दोन ‘जीआर’ मागे घ्यावे लागले. फडणवीस हे मराठीसाठी ऐवजी हिंदीसाठी भांडत आहेत. कोण दबाव टाकतेय तुमच्यावर एवढा? देशात काँग्रेस असल्यापासून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा तेव्हा मोठा लढा होता. तेव्हा लोहपुरुष म्हणवणारे सरदार वल्लभभाई पटेल यांनी महाराष्ट्राला मुंबई देऊ नये, असे सांगितले होते, त्यावेळी मोरारजी देसाई यांनी मराठी माणसांवर गोळ्या घातल्या होत्या.
केंद्र सरकार हे मराठी लोकांना चाचपून बघत आहे. त्यातली हिंदी भाषा आणणे ही पहिली पायरी आहे आणि मुंबई गुजरातला मिळवायची आहे. भाषा आणि जमीन गेली तर तुम्हाला कोणाही विचारणार नाही. मुंबईत हिंदी चॅनलवाले सत्ताधाऱ्यांच्या छत्राखालील ढेकूण आहेत. मुंबईत एका मिठाईवाल्याच्या कानाखाली मारले तर देशात बातमी बनते, हे कशाप्रकारे राजकारण सुरू आहे हे लक्षात घ्या, असे ते म्हणाले.
हिंदी भाषेला २०० वर्षाचा इतिहास तर मराठीला २,५०० वर्षाचा इतिहास आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. वर्षानंतर एक रुपयाही आला नाही. कुठल्याही भाषेला अभिजात दर्जा मिळायला ती कमीतकमी १,४०० वर्षे जुनी भाषा पाहिजे. हिंदीला अभिजात दर्जा मिळायला १,२०० वर्षे बाकी आहेत. हिंदी भाषेमुळे हिरो-हिरोईन यांचे फक्त भले झाले आहे. हिंदी भाषेमुळे दुसऱ्या प्रदेशात जाऊन नोकऱ्या कराव्या लागतात आणि त्यासाठी हिंदी भाषा सक्ती इथे करत आहेत. देशात हिंदी भाषेमुळे २५० भाषा मारल्या गेल्या आहेत. त्यात मारवाडी, भोजपुरी व इतर भाषा आहेत. बिहारने मातृभाषा स्वीकारली, तिथे ९९ टक्के लोक मूळ मातृभाषा बोलतात. तर हनुमान चालीसाही हिंदी नाही अवधी भाषेत आहे. हिंदी भाषा वाईट नाही, मात्र लादणार असाल तर चालणार नाही. हे सरकार हिंदीच्या बुरख्याखाली मराठी संपवायला निघाले तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा त्यांनी दिला.
दुबे मुंबईत ये, तुला पटक पटक के मारतो!
उत्तर भारतीय खासदार दुबे नावाचा व्यक्ती म्हणतोय की मराठी माणसांना पटक-पटकके मारणार त्याला एवढेच सांगायचे आहे की, तू मुंबईत ये, आम्ही तुला मुंबईच्या समुद्रात डुबो डूबो के मारणार. हे काही बोलतात त्यांना त्यांच्या मागचे सत्ताधारी आहेत वाचवायला. पण सरकारने लक्षात ठेवावे की तुमची सत्ता असेल विधानसभा आणि लोकसभेत, रस्त्यावर मात्र मराठी माणसाची सत्ता आहे. मराठी माणसांनो तुम्ही पण ५६ इंचाची छाती काढून फिरा, मराठी माणसाचा अपमान केला तर तुमच्या कान आणि पाठीशी युती करणार म्हणजे करणार, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
मीरा-भाईंदरपासून पालघरपर्यतचा पट्टा गुजरातला जोडण्याचे षडयंत्र
मुंबई घशात घालण्यासाठी मोठे षडयंत्र सुरु आहे. हे सगळं षडयंत्र तुम्ही नीट समजून घेतले पाहिजे. मीरा-भाईंदरपासून ते पालघरपर्यंतचा पट्टा गुजरातला जोडण्यासाठी हे सर्व मतदारसंघ ह्यांना अमराठी लोकांचे करायचे आहेत. हा यांचा मोठा डाव आहे, तो हाणून पाडण्यासाठी मराठी माणसांनी एकत्र राहण्याची गरज आहे हे मी कधीपासून बोंबलून सांगतोय, असा गौप्यस्फोटही राज ठाकरे यांनी केला.