महाराष्ट्र

नांदेडहून निघालेल्या राज्यराणी एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी घातला धुमाकूळ; मनमाड ते नाशिक दरम्यान चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना लुबाडले

नांदेडहून निघालेल्या राज्यराणी एक्सप्रेसमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला. मनमाड ते नाशिक दरम्यान अनेक प्रवाशांना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत लुबाडले. या घटनेत काही प्रवासी जखमीही झाले आहेत.

Swapnil S

नांदेड : नांदेडहून निघालेल्या राज्यराणी एक्सप्रेसमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला. मनमाड ते नाशिक दरम्यान अनेक प्रवाशांना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत लुबाडले. या घटनेत काही प्रवासी जखमीही झाले आहेत. लुबाडल्यानंतर पळून गेलेल्या चोरट्यांना तात्काळ पकडावे, या मागण्यासाठी प्रवाशांनी काही काळ रोको आंदोलनही केले. या घटनेमुळे तब्बल दोन ते तीन तास राज्यराणी एक्सप्रेस खैरवाडी या स्थानकावर थांबवण्यात आली होती. त्यामुळे नांदेडहून मुंबईकडे निघालेल्या प्रवाशांचे मात्र, प्रचंड बेहाल झाले.

नांदेडहून बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास निघालेली राज्यराणी एक्सप्रेस गुरुवारी सकाळी मनमाडहून नाशिककडे निघाली. त्यावेळी अचानक रेल्वेमध्ये प्रवाशांना धमकावणे आणि लुबाडण्याचा प्रकार सुरू झाला. प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुबाडण्यात येत होते. यावेळी काही प्रवाशांनी प्रतिबंध केला असता त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. यात विशाल शंकर कांबळे यासह अन्य प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामुळे काही प्रवाशांनी खैरवाडी येथे चैन ओढून रेल्वे थांबवली. त्यानंतर संतप्त प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना धारेवर धरले. चोरट्यांना पकडण्याच्या मागणीसाठी रेल्वे रोको आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. यामुळे अनेक गाड्या उशिराने धावल्या.

रेल्वेच्या सुरक्षेबाबत प्रवाशांचा संताप

दरम्यान, मुंबईमध्ये गुरुवारी होणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून अनेक प्रवासी राज्यराणी एक्सप्रेसने मुंबईकडे जात होते. त्याचवेळी महापरिनिर्वाण दिनानिमित्त हजारो प्रवासी मुंबईकडे निघाले आहेत. या प्रवाशांनी अपुऱ्या रेल्वे सुरक्षेबाबत संताप व्यक्त केला आहे. दोन ते अडीच तासानंतर राज्यराणी खैरवाडीहून मुंबईकडे रवाना झाली. सकाळी १० वाजता मुंबईत पोहोचण्याची वेळ असलेली राज्यराणी एक्स्प्रेस गुरुवारी दुपारी १.४० वाजता मुंबई येथे पोहोचली.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री