मुंबई : लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर महायुतीत अंतर्गत कुरबुरी सुरू झाल्या असून अजितदादांना पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवल्याची घटना ताजी असतानाच आता शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांना मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्द्यावर लक्ष्य केले. यामुळे खवळलेल्या भाजप नेत्यांनी रामदास कदम व मुख्यमंत्री शिंदेंना इशारा दिला आहे.
राजकीय पक्षांतील अंतर्गत वाद हे काही नवीन नाही. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर अंतर्गत वाद उफाळून आले, तर विरोधकांना आरोप-प्रत्यारोप करण्याची आयती संधी मिळते. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या मुद्द्यावरून, तर कधी विकासकामांच्या मुद्द्यावरून रामदास कदमांनी भाजपला टार्गेट केले आहे.
यापूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दापोली दौरा रामदास कदम यांच्या चांगला जिव्हारी लागला होता. आपला मुलगा योगेश कदम यांच्या मतदारसंघात येऊन भाजपच्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी परस्परविरोधी काम केल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला होता. लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरून कोकणात शिंदेंच्या शिवसेनेला जागा न सोडल्यामुळे रामदास कदम यांनी थेट नाराजी व्यक्त करत भाजपवर जोरदार टीकाही केली होती.
...तर युती तोडून स्वतः लढा, रामदास कदम यांचे खुले आव्हान
मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न पेटला असून, भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर रामदास कदम यांनी केलेल्या टीकेचा भाजप नेत्यांनी लागलीच जोरदार समाचार घेतला. यामुळे अधिकच आक्रमक झालेल्या रामदास कदम यांनी, युतीमध्ये तुमच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा असतील तर युती तोडून स्वतंत्र लढा, असे खुले आव्हानदेखील भाजपला दिले आहे.
रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री - रामदास कदम
मागील १४ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम होत नाही. चाकरमान्यांचे हाल होत आहेत. समृद्धी महामार्गाचे काम ३ वर्षांत पूर्ण होते. मग मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण का होत नाही? रवींद्र चव्हाण यांना शिवसेनेची ॲलर्जी आहे. रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री असून, ते केवळ चमकोगिरी करतात, अशी टीका करत त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. रामदास कदम यांच्या या टीकेनंतर महायुतीतील धुसफूस वाढली आहे.
...तर थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही - रवींद्र चव्हाण
बोलायला मलासुद्धा येते. कधीतरी रस्त्यात समोरासमोर या, अशा भाषेत मला बोलता येते ना की, कोणी वाचवायला देखील राहणार नाही. रवींद्र चव्हाण आहे मी, थेट उत्तर देऊ शकतो, पण युतीधर्म पाळतोय त्याचा अर्थ असा नाही की कोणीही काहीही बोलेल आणि आम्ही ऐकून घेऊ, असे होणार नाही. एक लक्षात ठेवा, तोंड सांभाळून बोलायचे नाहीतर थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत रवींद्र चव्हाण यांनी रामदास कदम यांच्यावर पलटवार केला.
फडणवीसांचा शिंदे गटाला इशारा
कदम यांच्या आरोपानंतर प्रकरण थांबेल असे वाटत असतानाच कदम यांनी रवींद्र चव्हाण यांची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे केल्याचे समजते. महायुती असताना असे जाहीरपणे बोलणे योग्य नाही, काही तक्रार होती, तर पक्षांतर्गत चर्चा करणे गरजेचे होते. बोलताना काही पथ्य पाळणे आवश्यक आहे. भाजपलाही बोलता येते, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाला दिला आहे.
भाजप मनावर दगड ठेवून महायुतीत - दरेकर
एवढे चांगले वातावरण असताना कुणीही मिठाचा खडा टाकू नये. आमचे कार्यकर्तेही मनावर दगड ठेवून महायुतीत लढत आहेत. भाजपच्या संयमाला दुबळेपणा समजू नका. महायुतीची गरज फक्त भाजपला आहे असे नाही. महायुतीचा धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे, आरेला का रे भाजपलाही करता येते, असा इशारा भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी शिंदे गटाला दिला.