मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला होता. मात्र मंगळवारी नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव सभापती राम शिंदे यांनी फेटाळला. यामुळे नीलम गोऱ्हे यांना दिलासा मिळाला आहे.
विधान परिषदेचे सदस्य ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी यावेळी चर्चेची मागणी लावून धरली. मात्र सभापती राम शिंदे यांनी अनिल परब यांची ही मागणी फेटाळली.
विधिमंडळ अधिनियम, कायदेशीर बाबी वाचून दाखवल्या. तसेच १४ दिवसापूर्वी ठराव सादर करणे अपेक्षित असते.
परंतु कायदेशीर बाबी आणि अधिनियमाच्या कक्षेत बसत नसल्याचे सांगत संबंधित ठराव फेटाळून लावला.
परब यांनी यावर मत मांडताना, ठराव सादर करताना कायदेशीर प्रकिया पूर्ण केली आहे. त्यामुळे १४ दिवसांनंतर तो चर्चेला आणावा. ज्या सदस्यांनी स्वाक्षरी केली आहे, त्यांची मते जाणून घ्यावी, अशी विनंती सभापतींना केली.
मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यावर आक्षेप घेतला. सभापतींनी निर्णय दिल्यानंतर पुन्हा चर्चा करता येत नाही, असे सांगत परब यांना चिमटा काढला.
परब त्यामुळे संतप्त झाले. विरोधकांनी त्यानंतर ठरावावर चर्चेची मागणी लावून धरली. मात्र सभापतींनी विरोधकांची मागणी फेटाळून लावली.
सभागृहात त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. गोऱ्हे यानी शिवसेनेत (ठाकरे गट) मोठे पद मिळवण्यासाठी २ मर्सिडीज द्याव्या लागतात, असे वादग्रस्त विधान केले होते. या वक्तव्याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती.
अखेर तिसऱ्या आठवड्यात निर्णय
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर ५ मार्च २०२५ रोजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात १० हून अधिक सदस्यांची स्वाक्षरी घेऊन अविश्वास ठराव विधिमंडळ सचिवांकडे सादर केला. त्यानंतर गोऱ्हे आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) आमदारांमध्ये सभागृहात अनेकदा खडाजंगी झाली. अखेर अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी सभापती शिंदे यांनी ठरावावर निर्णय दिला.