उजनीच्या पाण्यावर डेटा सेंटरचा डोळा; आमदार रोहित पवार यांचा सवाल (Photo-X/@RRPSpeaks)
महाराष्ट्र

उजनीच्या पाण्यावर डेटा सेंटरचा डोळा; आमदार रोहित पवार यांचा सवाल

उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या एआय डेटा सेंटर आणि अणुऊर्जा प्रकल्पांसाठी एकूण तब्बल ९ टीएमसी पाणी वापरले जाणार असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

Swapnil S

पुणे : उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या एआय डेटा सेंटर आणि अणुऊर्जा प्रकल्पांसाठी एकूण तब्बल ९ टीएमसी पाणी वापरले जाणार असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या प्रकल्पांमुळे उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या साडेपाच लाख शेतकरी आणि ३० हजार मच्छिमार कुटुंबांच्या रोजगारावर तसेच अर्थकारणावर गंभीर परिणाम होण्याची भीती त्यांनी गुरुवारी व्यक्त केली. उजनीतील एआय डेटा सेंटर हा विकास आहे की विनाश? असा सवाल उपस्थित करत त्यांनी स्थानिक नागरिकांच्या पाण्याच्या गरजांबाबत चिंता व्यक्त केली.

दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून उभारण्यात आलेल्या उजनी धरणामुळे हजारो एकर शेतजमीन सिंचनाखाली आली आहे. राज्य सरकारकडून उजनी परिसरात दोन हजार मेगावॉट क्षमतेचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प आणि ४५० मेगावॉट क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन असल्याचे पवार यांनी सांगितले. या प्रकल्पांसह डेटा सेंटरच्या माध्यमातून सुमारे १ लाख ६५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचे सांगितले जात आहे. चीनमधील ‘सॅनी’ कंपनीकडून उजनीच्या जलाशयावर तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन सुरू असून, फ्रान्स आणि दक्षिण कोरियातील कंपन्यांचाही त्यात सहभाग असल्याचा दावाही त्यांनी केला.

डेटा सेंटरमधील सर्व्हर चोवीस तास सुरू असल्याने त्यांना थंड ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी आणि विजेची गरज भासते. प्रस्तावित डेटा सेंटरसाठी सहा टीएमसी, तर अणुऊर्जा प्रकल्पासाठी तीन टीएमसी पाणी लागणार असल्याचा दावा पवार यांनी केला. ठाणे शहराला वर्षभरात सुमारे ८.२५ टीएमसी पाण्याची गरज असताना, केवळ या दोन प्रकल्पांसाठी नऊ टीएमसी पाणी वापरले जाण्याची शक्यता त्यांनी अधोरेखित केली.

पर्यावरणावर परिणाम

उजनीच्या पाण्याचा लाभ घेणाऱ्या साडेपाच लाख शेतकऱ्यांची वार्षिक आर्थिक उलाढाल सुमारे १० हजार कोटी रुपये असल्याचे पवार यांनी नमूद केले. पाणी अन्यत्र वळविल्यास या अर्थकारणावर परिणाम होऊ शकतो. याशिवाय, जलाशयावर मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या सुमारे ३० हजार मच्छीमार कुटुंबांची वार्षिक उलाढाल २०० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे त्यांनी सांगितले. जलाशयावर मोठ्या प्रमाणात सौरऊर्जा पॅनेल बसवल्यास माशांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथील तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उदाहरण देत त्यांनी जलचर आणि पर्यावरणावरील संभाव्य परिणामांकडे लक्ष वेधले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; नेरळ-माथेरान 'मिनी ट्रेन' आजपासून पुन्हा धावणार, बघा वेळापत्रक

वनसंपदेसाठी न्यायालयात दाद मागू; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

मतवारी दुष्काळाची! पर्यावरण मतपेटीत कधी उतरणार? दुष्काळमुक्तीसाठी राजकीय इच्छाशक्ती आणि मतदारांच्या जागरूकतेची गरज

कचरा टाकणाऱ्यांना ‘एआय’ कॅमेऱ्याची तंबी; मुंबई मनपाचा उपक्रम, कचरा इतरत्र टाकताच स्वच्छतेचा संदेश मिळणार

मुंबईसह आठ शहरांत रेल्वेची डोअरस्टेप पार्सल सेवा; खासगी लॉजिस्टिक्स कंपन्यांच्या मदतीने घरपोच पार्सलची सुविधा