शिवसेना (शिंदे गट) आमदार आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आहेत. कर्जमाफी आणि पीक नुकसान भरपाईच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या एका शेतकऱ्याला मंत्री शिरसाटांनी थेट आपल्या घरी बोलावलं आणि ज्यूस पाजून उपोषण सोडवलं. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि उपोषण सोडवण्याचा हा अजब प्रकार पाहून विरोधक आक्रमक झालेत. शिरसाटांना उपोषणस्थळी जाण्यासाठी वेळ नसल्याचा आरोप होत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील संदीप सेठी हे शेतकरी गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले होते. तहसीलदारांसह अधिकाऱ्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली तरी सेठी यांनी पालकमंत्री शिरसाट यांनी उपोषणस्थळी येऊन आश्वासन द्यावे, अशी अट घातली होती. त्यानंतर, अधिकाऱ्यांनी मंत्री शिरसाट यांच्या स्वीय सहाय्यकाशी संपर्क साधला. मात्र, व्यस्त वेळापत्रकामुळे मंत्र्यांना कन्नडला येणे शक्य नाही, त्यामुळे उपोषणकर्त्यांनाच मंत्र्यांच्या घरी आणा, इथे उपोषण सोडवू, असा निरोप देण्यात आला. त्यानुसार, सेठी यांना रुग्णवाहिकेतून शिरसाट यांच्या घरी आणले गेले आणि तिथे उपोषण सोडण्यात आले.
सरकारमध्ये एकाहून एक नमुने 'सत्तेची मस्ती' आणि 'असंवेदनशीलपणा'
या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारसह शिरसाट यांच्यावर जोरदार टीका करत हल्लाबोल केला आहे. "या सरकारमध्ये एकाहून एक नमुने आहेत. आता अजून आगळा वेगळा उत्कृष्ट नमुना समोर आला आहे. सिडकोमध्ये ५००० कोटीचा भ्रष्टाचार करायला, हॉटेलचा व्यवहार करायला वेळ असलेल्या शिरसाटांना उपोषणस्थळी जाण्यासाठी वेळ नव्हता. किती ही सत्तेची मस्ती आणि केवढा हा असंवेदनशीलपणा!", अशी टीका रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे.
दरम्यान, या घटनेवर शिरसाट यांच्याकडून अद्याप स्पष्टीकरण आलेले नाही.