हारुन शेख/लासलगाव
सध्या युरियाचा टंचाईला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत असताना अनुदानित युरिया खताचा काळा बाजार उघडकीला आला असून विंचूरजवळील विष्णुनगर येथे युरियाचा काळा बाजार करणाऱ्यांवर लासलगाव पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत ८८ लाख ३६ हजार ६२४ रुपये किमतीचा युरियासह मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात एका माजी जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा समावेश आहे.
विंचूरजवळ विष्णुनगर परिसरातील कांदा खळ्याच्या भागात शेती उपयोगी युरियाचा काळा बाजार होणार असल्याची गोपनीय माहिती मिळालीनंतर पोलिसांनी क्रांती हॉटेलच्या पाठीमागे छापा टाकला असता आयशर वाहनातून लातूर येथून आणलेला अनुदानित युरियाचा साठा व्यावसायिक विक्रीच्या उद्देशाने दुसऱ्या मालट्रकमध्ये भरला जात होता.
घटनास्थळी कृषी विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दोघा व्यक्तींची चौकशी केली असता बातमीची खात्री पटली आणि कृषी अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील कलम ३ (२), (d), ७, ८, ९, १० आणि भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी ज्ञानेश्वर पवार (३७) आणि सागर गरड (२७) या दोघा आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ७२८ गोण्या युरिया व दोन वाहनांसह सुमारे ८८ लाख ३६ हजार ६२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या संबंधी पुढील अधिक सखोल तपास पोलीस करत आहेत.
पोलीस आणि कृषी विभागाची एकत्र कारवाई
सरकारकडून शेतकऱ्यांना शेतपिकासाठी अनुदानित युरिया सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिला जातो; मात्र, काळ्या बाजारात हाच युरिया चढ्या दराने विकला जात असल्याने सरकारची आर्थिक फसवणूक होत होती. शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध न झाल्याने त्यांची गैरसोय होत होती. हा प्रकार रोखण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एम. आणि निफाड पोलीस उपअधीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते, पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके यांच्यासह पोलीस पथकातील अंमलदार अरुण डोंगरे, ज्ञानेश्वर जाधव, संदीप निचळ, बाळासाहेब कांदाळकर, उत्तम गोसावी, अमोल तळेकर आणि कैलास घोलप या पोलीस पथकासह जिल्हा परिषद कृषी विभागाचे मोहीम अधिकारी दीपक सोमवंशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जितेंद्र पगार, पंचायत समिती निफाडचे कृषी अधिकारी संदीप मोगल यांनी संयुक्तपणे केली.
गुजरात आणि मुंबईत विक्रीचा संशय
अनुदानित युरिया गुजरात आणि मुंबईतील औद्योगिक क्षेत्रात विक्रीसाठी पाठवण्याचा प्रयत्न असल्याची प्राथमिक तपासात माहिती समोर आली आहे. त्याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.