

भिवंडी : भिवंडीतील नारपोली येथील गंगारामवाडी परिसरातील कोहिनूर अपार्टमेंट दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेने रविवारी इमारतीचा उर्वरित धोकादायक भाग पाडण्याची तयारी केली. मात्र, दुर्घटनाग्रस्त आणि शेजारील इमारतीतील रहिवाशांनी पाडकामास तीव्र विरोध दर्शवत, आधी पुनर्वसन, पंचनामा आणि लेखी आश्वासन द्या, त्यानंतरच कारवाई करा, अशी ठाम भूमिका घेतली.
कोहिनूर अपार्टमेंटमध्ये एकूण ४८ सदनिका असून, त्यापैकी 'बी' विंगचा मोठा भाग गुरुवारी रात्री कोसळून भीषण दुर्घटना घडली. या घटनेनंतर महापालिकेने उर्वरित 'ए' विंग धोकादायक असल्याचे सांगत तो पाडण्यासाठी पोकलेनसह कर्मचारी घटनास्थळी पाठवले. मात्र रहिवाशांनी कारवाई रोखत प्रथम त्यांच्या फ्लॅटमधील मौल्यवान वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे आणि अन्य साहित्य सुरक्षितपणे बाहेर काढण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली.
याशिवाय, संबंधित मालमत्तेचा अधिकृत पंचनामा करून द्यावा, नुकसानग्रस्तांची नोंद घ्यावी तसेच संबंधित बिल्डरकडून पुनर्बाधणी व कायमस्वरूपी पुनर्वसनाबाबत लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय पाडकाम सुरू करू नये, अशी मागणी रहिवाशांनी केली.
इमारतीलगतच्या दरम्यान, दुर्घटनाग्रस्त दुसऱ्या इमारतीलाही धोका असल्याचे प्राथमिक पाहणीत आढळून आले. त्यामुळे महापालिकेने त्या इमारतीतील रहिवाशांना तातडीने इमारत रिकामी करून संरचनात्मक (स्ट्रक्चरल) ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर अनेक रहिवाशांनी आपले साहित्य हलविण्यास सुरुवात केली असली, तरी त्यांनीही पुनर्वसन आणि सुरक्षिततेबाबत स्पष्ट हमी मिळाल्याशिवाय पाडकामास विरोध कायम ठेवला आहे.
रहिवाशांच्या तीव्र विरोधानंतर प्रभाग समिती क्रमांक ४ चे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांनी पाडकामाची कारवाई तात्पुरती स्थगित केली. सोमवारी नागरिकांशी सविस्तर चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
प्रशासनाने बाधितांना विश्वासात घेऊनच कारवाई करावी. दुर्घटनाग्रस्त इमारत अत्यंत निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे कमकुवत झाली होती. तसेच 'ए' विंगच्या छतावर मोबाईल टॉवर उभारण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच बाधित कुटुंबांना तात्पुरता निवारा आणि आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेने पार पाडावी.
यशवंत टावरे, स्थानिक नगरसेवक
इमारतीच्या केअरटेकरला अटक
भिवंडीतील कोहिनूर इमारत दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवत इमारतीचा केअरटेकर अमृतलाल निशाद (४९) याला अटक केली आहे. रविवारी सुट्टीच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
या प्रकरणी शुक्रवारी उशिरा भोईवाडा पोलीस ठाण्यात इमारत मालक बिलाल अहमद अबूबकर खान आणि दुरुस्ती कामाचा कंत्राटदार अशोक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांचा पोलिसांकडून अद्याप शोध सुरू आहे.
अटक करण्यात आलेला अमृतलाल निशाद हा दुर्घटनाग्रस्त इमारतीतच राहत होता. इमारतीचा केअरटेकर म्हणून तो जबाबदारी सांभाळत असून, इमारत मालकाच्या फ्लॅटचे भाडे वसूल करण्याचे कामही तो करत होता. प्राथमिक
तपासात इमारतीच्या दुरुस्तीसाठी त्याने फ्लॅटधारकांकडून पैसे गोळा करून मजुरांकडून दुरुस्तीची कामे करून घेतल्याची माहिती समोर आली आहे. दुर्घटनेच्या अनुषंगाने निष्काळजीपणा आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू असून, फरार असलेल्या इमारत मालक आणि कंत्राटदाराचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. या दुर्घटनेमागील सर्व बाबींचा सखोल तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.