रुपाली चाकणकरांचा राजीनामा; अशोक खरात प्रकरण भोवले X (Rupali Chakankar)
महाराष्ट्र

रुपाली चाकणकरांचा राजीनामा; अशोक खरात प्रकरण भोवले

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा खरातची पाद्यपूजा करतानाचा व्हिडीओ आणि त्याच्यासोबतचे काही फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर चाकणकर यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली होती.

Swapnil S

मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा खरातची पाद्यपूजा करतानाचा व्हिडीओ आणि त्याच्यासोबतचे काही फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर चाकणकर यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली होती. तसेच विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. अखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर रात्री उशिरा चाकणकरांनी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणाने आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रुपाली चाकणकर यांनी नुकतीच पुणे 'डीजीं'ची भेट घेतली होती. तसेच सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. त्यानंतर रात्री उशिरा चाकणकर यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली व या भेटीत त्यांनी आपला राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

नाशिकमधील महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी तथाकथित भोंदू ज्योतिषी कॅप्टन आणि अशोक खरात याच्याशी संबंधित प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला. सुनेत्रा पवार यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. दरम्यान, आपण वैयक्तिक आणि स्वेच्छेने राजीनामा देत असल्याचे चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे.

चाकणकर या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील श्री शिवनिका संस्थानच्या विश्वस्त असून, त्या संस्थेचा कॅप्टन खरात हा अध्यक्ष आहे. महिलांचा लैंगिक छळ आणि बलात्काराच्या आरोपांवरून पोलिसांनी खरातला अटक केल्यानंतर मागील दोन दिवसांपासून चाकणकर चांगल्याच अडचणीत आल्या होत्या. एक वर्षापूर्वी भोंदूबाबा म्हणून खरात याचा पर्दाफाश करणाऱ्या स्थानिक पत्रकाराला धमकावून माफी मागायला लावल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. याशिवाय चाकणकर यांचे भोंदू खरातसोबतचे विविध फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाले आहेत.

त्यामुळे चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षांसह विविध स्तरातून दबाव वाढत चालला होता. त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदा घेऊन चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन चाकणकर यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले होते.

रुपाली चाकणकर यांनी भोंदू खरात प्रकरणात आपली बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी भेट घेतली होती. या भेटीत फडणवीस यांनी चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रात्री उशिरा चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. या चर्चेनंतर चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला.

राजीनामा देण्याचे आदेश दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार - रोहित पवार

मुख्यमंत्र्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार, परंतु केवळ राजीनामा घेऊन चालणार नाही, तर या प्रकरणाच्या तळाशी जाऊन पारदर्शक चौकशी करावी आणि आ. अमोल मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या अपघाताशी या भोंदू बाबाचे कनेक्शन आहे का? याचाही तपास व्हायला हवा, असे रोहित पवार यांनी द्विट केले आहे.?

राष्ट्रवादीतील तिसरा राजीनामा

रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले आहे. संवैधानिक पदावर असताना राजीनामा द्यावा लागलेल्या रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तिसऱ्या नेत्या ठरल्या आहेत. यापूर्वी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

कमी पाण्याची पिके घ्या; शेती खात्याचे शेतकऱ्यांना आवाहन

आसाममधील चहाच्या मळ्याचा ‘टी टुरिझम’वर भर; ग्राहकांना चहाच्या संस्कृतीशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न

‘गृह’ अन् ‘महसूल’ खाते कोणाकडे हे माहिती आहे का? परिवहन मंत्री सरनाईक यांचा आमदार मेहतांना टोला

मुंबईत गंभीर गुन्हेगारीत वाढ; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खुनाच्या गुन्ह्यांमध्येही मोठी वाढ

Navi Mumbai : एनआरआय फ्लेमिंगो तलावावर पर्यटकांची झुंबड; DPS, TSC वेटलँड्स पुनर्जीवित करा, पर्यावरणवाद्यांची राज्य सरकारकडे मागणी