संतांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन; 'ज्ञानोबा-तुकाराम'चा जयघोष, महापालिकेकडून अधिकृत स्वागत 
महाराष्ट्र

संतांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन; 'ज्ञानोबा-तुकाराम'चा जयघोष, महापालिकेकडून अधिकृत स्वागत

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे गुरुवारी सायंकाळी पुणे शहरात मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले.

Swapnil S

पुणे : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे गुरुवारी सायंकाळी पुणे शहरात मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले. 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या अखंड जयघोषाने, टाळ-मृदंगाच्या गजराने आणि विठ्ठलनामाच्या गजराने संपूर्ण पुण्यनगरी दुमदुमून गेली. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या वतीने दोन्ही पालख्यांचे आणि सोहळा प्रमुखांचे अधिकृत स्वागत करण्यात आले.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा बुधवारी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात मुक्काम होता. पिंपरी-चिंचवडकरांच्या प्रेमळ आदरातिथ्यानंतर गुरुवारी सकाळी पालखी पंढरपूरच्या दिशेने पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. "विठ्ठल नामाचा रे टाहो..." या नामगजरात आणि अभंगांच्या सुरावटीत वारकरी भक्तिभावाने पुढे जात होते.

वाकडेवाडी चौकात पोहोचताच भाविकांचा उत्साह आणखी वाढला. सायंकाळी पाचच्या सुमारास संत तुकाराम महाराजांची पालखी पाटील इस्टेट चौकात दाखल झाली. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो पुणेकरांनी पालखीचे दर्शन घेत जयघोषात स्वागत केले. त्यानंतर महापालिकेच्या वतीने पालखीचे आणि सोहळा प्रमुखांचे स्वागत करण्यात आले. पुढे हा सोहळा संचेती चौक आणि फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता मार्गे शहरात दाखल झाला. दोन्ही संतांच्या पालख्यांचे एकाच दिवशी पुण्यात झालेल्या आगमनामुळे संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. विठ्ठलनामाचा गजर, वारकऱ्यांचा उत्साह आणि पुणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे पुण्यात भक्तीचा महापूर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.

विठ्ठल नामाचा अखंड जयघोष

संत तुकाराम महाराजांच्या पालखीनंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळाही संगमवाडीमार्गे पुण्याकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी सुमारे पावणेसहा वाजता सोहळ्याचा चौघडा पाटील इस्टेट चौकात पोहोचला. सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तेथे दाखल झाली. माऊलींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या अखंड घोषात माऊलींची पालखी संचेती चौक मार्गे पुढे रवाना झाली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग