सांगली : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित समीर गायकवाड (वय ४५, रा. विकास चौक, सांगली) याचा मंगळवारी सकाळी सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराने मृत्यू झाला. त्याच्या पश्चात भाऊ आणि पत्नी आहे. प्रत्येक रविवारी त्याला विश्रामबाग पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगण्यात आले होते.
समीर गायकवाड याला सोमवारी मध्यरात्री अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला तातडीने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यूचे कारण हृदयविकार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
समीर गायकवाड हा गेल्या चार वर्षांपासून पानसरे हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर होता. जामीन मिळाल्यानंतर तो सांगलीतील विकास चौक परिसरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूरमध्ये सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले, तर त्यांची पत्नी उमाताई पानसरे याही जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान २० फेब्रुवारी २०१५ रोजी गोविंद पानसरे यांचे निधन झाले होते. याप्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर, अमोल काळे आणि समीर गायकवाड यासह दहा जणांना एसआयटीने अटक केली होती.