'समृद्धी'वर अपघात: एकाच कुटुंबातील ५ ठार Photo : X
महाराष्ट्र

'समृद्धी'वर अपघात; एकाच कुटुंबातील ५ ठार

समृद्धी महामार्गावर रविवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास धामणगाव रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात चंद्रपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हे कुटुंब चंद्रपूरहून अमरावतीकडे येत असताना ही दुर्घटना घडली.

Swapnil S

अमरावती : समृद्धी महामार्गावर रविवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास धामणगाव रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात चंद्रपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हे कुटुंब चंद्रपूरहून अमरावतीकडे येत असताना ही दुर्घटना घडली.

अपघातात भास्कर महादेव जीवने (४३), महादेव जिवाजी जीवने (६५), लताबाई महादेव जीवने (६०), आरती भास्कर जीवने (४१) आणि जिज्ञा भास्कर जीवने (१२) यांचा मृत्यू झाला. हे सर्वजण चंद्रपूर शासकीय डी.एड. महाविद्यालयामागील बहुपेठ परिसरातील रहिवासी होते.

कार थेट कंटेनरच्या खाली घुसली

जीवने कुटुंबीय कारने समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होते. धामणगाव रेल्वे स्थानकाजवळ रस्त्याच्या कडेला एक कंटेनर उभा होता. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील ही कार थेट उभ्या कंटेनरच्या मागील बाजूस धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा दर्शनी भाग पूर्णपणे कंटेनरमध्ये घुसला आणि अक्षरशः चक्काचूर झाला. त्यामुळे कारमधील पाचही जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

‘समृद्धी’वरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलिस, महामार्ग पोलिस आणि जिल्हा वाहतूक पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य राबवण्यात आले, मात्र अपघाताची तीव्रता जास्त असल्याने कोणालाही वाचवता आले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती चंद्रपूरमध्ये पोहोचताच जीवने कुटुंबीयांच्या नातेवाईकांमध्ये आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली. एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Palghar : वाढवण ऐतिहासिक पर्व ठरेल; मुख्यमंत्र्यांचा दावा; म्हणाले, ‘मच्छिमारांना विश्वासात घेऊनच विकास’

अयोध्या अपहार : आठही आरोपींच्या घरांवर छापे

TET पेपरफूट : आंतरराज्यीय रॅकेटचा संशय; तिघांना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

बंड नव्हे, फडणवीसांचे पंख कापण्याचे षडयंत्र; उद्धव ठाकरे यांचा आरोप, ६ खासदारांना अपात्र ठरवण्याची केली मागणी

Vat Purnima 2026: पूजेचा शुभ मुहूर्त, साहित्य, विधी आणि सावित्री-सत्यवानाची कथा जाणून घ्या