सांगली : ढवळी (ता. वाळवा) येथील बाळूमामा मंदिरात जिवंत नागाची पूजा करण्यात येत असल्याची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने हालचाली करून पुजाऱ्यासह नाग ताब्यात घेतला. न्यायालयाच्या आदेशाने नागाची नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांनी गुरूवारी दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, ढवळीतील बाळूमामा मंदिरात पुजारी जितेंद्र उर्फ विशाल बबन पाटील हा जिवंत नागाची पूजा करत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. वन विभागाच्या पथकाने तत्काळ मंदिरात धाव घेतली असता पुजारी पाटील हा नाग घेउन बाहेर पडल्याची माहिती मिळाली. यानंतर वन कर्मचाऱ्यांनी ढवळी ते भडकंबे मार्गावर पुजारी पाटील याला गाठून झडती घेतली असता त्याच्याकडे नाग सर्प आढळला. तात्काळ सर्पासह त्याला ताब्यात घेण्यात आले. याबाबत वन गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित पाटील याच्याकडून पुन्हा असा प्रकार करणार नाही असे हमीपत्र घेउन मुक्त करण्यात आले.