संजय गायकवाड यांची अखेर दिलगिरी; ‘शिवाजी कोण होता’ वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न, शिवरायांच्या एकेरी उल्लेखावर इशाराही दिला (Photo-X/@sanjaygaikwad34)
महाराष्ट्र

संजय गायकवाड यांची अखेर दिलगिरी; ‘शिवाजी कोण होता’ वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न, शिवरायांच्या एकेरी उल्लेखावर इशाराही दिला

सत्ताधारी शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी अखेर ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाच्या वादप्रकरणी दिलगिरी व्यक्त करत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.’

Swapnil S

बुलढाणा : सत्ताधारी शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी अखेर ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाच्या वादप्रकरणी दिलगिरी व्यक्त करत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.’ सदर प्रकरणात माझ्याकडून काही अयोग्य शब्द वापरले गेले. या प्रकरणी कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो’, असे ते आ. गायकवाड म्हणाले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख मी कदापि सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शिर्षकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. यासंबंधीची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. त्यात आमदार गायकवाड हे आंबी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करताना ऐकू येत आहेत. या प्रकरणी गायकवाड यांच्यावर टीकेची झोड उठली असताना त्यांनी शुक्रवारी दिलगिरी व्यक्त करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

संजय गायकवाड म्हणाले, छत्रपती शिवरायांचा उल्लेख नेहमी सन्मानपूर्वक ‘छत्रपती शिवाजी महाराज’, असाच व्हावा, ही माझी ठाम भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा कोणताही एकेरी किंवा अवमानकारक उल्लेख मी कदापि सहन करणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. संबंधित पुस्तकातील एकेरी उल्लेखांवर मी आक्षेप नोंदवला असून, हा विषय वादाचा नसून संस्कार आणि आदराचा आहे’, असे माझे मत आहे. अलीकडील वादात माझ्याकडून वापरले गेलेले काही शब्द अयोग्य होते, याची मला जाणीव आहे आणि त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मला खेद आहे. संबंधितांनी योग्य दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा गोष्टी टाळाव्यात, ही माझी अपेक्षा आहे. छञपती शिवाजी महाराज की जय. एक कट्टर शिवभक्त, असे गायकवाड यांनी आपल्या दिलगिरीत म्हटले आहे.

‘शिवाजी शिक्षण संस्थे’चे नाव बदलतानाही मी त्यांना सांगितले की, ‘छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था’, असे करण्याची सूचना केली. आम्ही शिवाजी महाराजांच्या विचाराने जगणारे लोकं आहोत. त्यांच्या नावाने मरणारे लोकं आहोत. त्यामुळे पदोपदी त्यांचा अवमान आम्ही सहन करणार नाही.

गायकवाडांच्या विधानाशी पक्षाचा संबंध नाही...

सत्ताधारी शिवसेनेने बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाविषयी केलेल्या वादग्रस्त विधानापासून फारकत घेतली आहे. संजय गायकवाड यांच्या विधानाशी पक्षाचा कोणताही संबंध नाही. ते त्यांचे वैयक्तिक विचार आहेत. त्यांच्या व्हायरल क्लीपचीही सत्यता आम्हाला माहिती नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.

शिवाजी महाराज हे आमचे दैवत...

संजय गायकवाड म्हणाले, प्रकाश आंबी यांनी प्रकाशित केलेले ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावर गोविंद पानसरे यांचा लेखक म्हणून उल्लेख नाही. त्या पुस्तकाच्या संदर्भात प्रकाश आंबी यांना फोन करून प्रकाशभाऊ आपण हे पुस्तक प्रकाशित केले आहे का? इथून सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज हे कोट्यवधी भारतीयांचे दैवत आहेत. त्यांना महाराष्ट्रासह देशभरातील जनता दैवत मानते. त्यांचा कुठेही उल्लेख करताना ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज’, असाच केला जातो. यापूर्वी मी शिवाजी असे एकेरी नाव असणाऱ्या संस्थांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज असे बदलण्याची आग्रही मागणी केली.

भूखंडावरून शिंदे-बावनकुळे यांच्यात जोरदार संघर्ष; महसूलची जमीन MMRDAकडे हस्तांतरित

‘नोटाबंदी’मध्ये जप्त केलेल्या जुन्या नोटा बदलून द्या; उच्च न्यायालयाचे रिझर्व्ह बँकेला आदेश

घरकामगार ‘कर्मचारी’ असतो, कुटुंबाचा सदस्य नाही! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Mumbai : पूर्व, पश्चिम द्रुतगती महामार्ग होणार खड्डेमुक्त; मॅस्टिक डांबरचा वापर, पालिका करणार ५० कोटींचा खर्च

कसारा मार्गावर १५ तासांचा ब्लॉक; आज आसनगाव ते कसारा स्थानकांदरम्यान लोकल राहणार बंद