महाराष्ट्र

संजय राऊतांच्या वक्तव्याने मनसेत नाराजी, संदीप देशपांडे म्हणाले, "आमच्या पक्षाची भूमिका...

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. काही ना काही कारणास्तव उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढत आहेत.

नेहा जाधव - तांबे

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. काही ना काही कारणास्तव उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढत आहेत. मात्र, आज खासदार संजय राऊत यांच्या एका विधानाने मनसेमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. ती नाराजी थेट राज ठाकरे यांच्या कानावर गेली आहे. याच दरम्यान, संजय राऊतांची अचानक प्रकृती अस्वस्थ झाल्याने भांडूप येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कॉँग्रेसला सोबत घेणं राज ठाकरेंची इच्छा - राऊत

आज सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांना विचारण्यात आलं, राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होणार का? काँग्रेस राज ठाकरे यांना सोबत घेईल का? यावर उत्तर देताना राऊत म्हणाले, "स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसलाही सोबत घेणं गरजेचं आहे. ही त्यांची भूमिका आहे, निर्णय नाही. या राज्यात काँग्रेससह प्रत्येक पक्षाचं स्वतःचं स्थान आहे." राऊतांनी पुढे स्पष्ट केलं की, "राज ठाकरे, शरद पवार साहेब, डावे पक्ष आणि काँग्रेस हे सर्व महाराष्ट्राच्या राजकीय चित्राचा भाग आहेत, त्यामुळे चर्चेत सर्व पक्षांचा सहभाग आवश्यक आहे."

मनसेची भूमिका अधिकृत प्रवक्ते मांडतील

राज ठाकरे यांना काय वाटतं? याचं उत्तर संजय राऊत यांनी दिलेलं मनसेला मात्र रुचलं नाही. याविषयी मनसे नेते संदीप देशपांडे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी तातडीची बैठक झाली. बैठकीनंतर संदीप देशपांडे म्हणाले, "आमच्या पक्षाची भूमिका ही सन्मानिय राज साहेब ठरवतात आणि तेच मांडतात. आमच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते मांडतील. मुळात असला कुठलाही प्रस्ताव आम्ही कॉँग्रेसकडे पाठवलेला नाहीये. त्यामुळे या बोलण्याला काही अर्थ नाही. आम्ही जर कुठला प्रस्ताव पाठवला आणि मग हर्षवर्धन साहेब बोलले तर गोष्ट वेगळी. असा प्रस्तावच आमच्याकडून गेलेला नाहीये. त्यामुळे त्याच्या विषयी काही बोलायची गरजच नाहीये."

रुग्णालयातूनच राऊतांचे स्पष्टीकरण?

संजय राऊत यांची तब्येत अचानक बिघडल्याने दुपारी त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या काही चाचण्या झाल्या होत्या. आजची पत्रकार परिषद झाल्यानंतर काही वेळाने त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी राज ठाकरेंना वैयक्तिक मेसेज पाठवून स्पष्टीकरण दिलं असल्याचं वृत्त समजतंय. "मी असं काहीही बोललो नाही. माझ्या विधानाचा अर्थ चुकीचा लावला गेला, असा मेसेज संजय राऊत यांनी पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे.

संजय राऊत रुग्णालयात

राऊतांना सध्या फोर्टिस रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं असून, प्राथमिक माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे. २०१९ मध्ये त्यांची अँजिओप्लास्टी झाली होती, तर अलीकडे पुन्हा अँजिओग्राफी झाल्याचं समजतं. डॉक्टरांनी त्यांना काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. राऊतांनी सातत्याने ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणासाठी अनुकूल भूमिका घेतली आहे, मात्र त्यांच्या या विधानामुळे मनसे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

विरारमध्ये ‘वचनपूर्ती जल उत्सव’ कार्यक्रमासाठी रस्ता अडवल्याने गोंधळ; भाजप, बविआ आणि नागरिकांमध्ये संघर्ष

Mumbai : खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड; तातडीने रुग्णालयात दाखल

Thane News : कबूतराला वाचवायला गेला, अग्निशामक जवानाने जीव गमावला; २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, परिसरात हळहळ

Diwali Rangoli Ideas : पारंपरिक ठिपक्यांपासून मॉडर्न डिझाइन्सपर्यंत! घर सजवण्यासाठी रांगोळीचे खास पर्याय

मुंबईकरांनो लक्ष द्या! पांजरापूर पंपिंग स्टेशनमध्ये ‘तांत्रिक बिघाड’; पाणी जपून वापरण्याचे BMC चे आवाहन