संतोष देशमुख हत्येला एक वर्ष: आईला हुंदका अनावर; 'आता कोणत्या देवाला साकडं घालावं?' म्हणत लेकरासाठी न्यायाची मागणी 
महाराष्ट्र

संतोष देशमुख हत्येला एक वर्ष: आईला हुंदका अनावर; 'आता कोणत्या देवाला साकडं घालावं?' म्हणत लेकरासाठी न्यायाची मागणी

माझ्या लेकराला इतक्या क्रुरपणे मारलं गेलं, आता कोणत्या देवाकडे साकडं घालावं, न्याय मिळेल का? माझं लेकरू त्या दिवशी मला बोलून गेलं...

Mayuri Gawade

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निघृणपणे हत्या करण्यात आली होती. आज या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असून, संतोष देशमुख यांचे कुटुंबीय तसेच गावकरी अजूनही त्यांना न्याय मिळेल याच्या प्रतीक्षेत आहेत.

अपहरण अन् हत्या

संतोष देशमुख यांचं अपहरण ९ डिसेंबर २०२४ रोजी करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची क्रूर हत्या करण्यात आली. या हत्येनंतर केज आणि मस्साजोग गावांमध्ये उद्रेक झाला. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह संतप्त ग्रामस्थांनी प्रकरणाचा त्वरित तपास करून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांच्या तपासात मुख्य आरोपी म्हणून धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी वाल्मिक कराड याचं नाव समोर आलं. त्याला नंतर अटक करण्यात आली आणि अखेर या प्रकरणात धनंजय मुंडे यांनाही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

भाऊ म्हणतो - आई सकाळपासून रडतेय...

संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख म्हणाले, "ज्यावेळी आमच्या गावात फिराल, तेव्हा आमच्या भावना कळतील. आमची आई सकाळपासून रडतेय, वर्षभरापासून वाट पाहतेय की दादा कुठे आहे? आज या प्रकरणाला एक वर्ष झालं, न्याय मिळायला हवा होता आणि आरोपींना फाशी व्हायला हवी होती. पण असे झाले नाही.

...तरच माझ्या भावाला खरी श्रद्धांजली

या प्रकरणातला फरार आरोपी कुठे आहे, असा आमचा सवाल आहे. मी माझ्या भावाच्या विचारांवरच वाटचाल करतो आहे. जेव्हा आरोपींना फाशी होईल आणि मदत करणाऱ्या पोलिसांना शिक्षा मिळेल, हीच माझ्या भावाला श्रद्धांजली असेल."

आता कोणत्या देवाकडे साकडं घालावं?

संतोष देशमुख यांच्या आई शारदाबाई देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, "सहा महिन्यांपासून आम्ही न्यायाची प्रतिक्षा करतोय, पण अजूनही कोर्टाच्या फेऱ्या सुरू आहेत. माझ्या लेकराला इतक्या क्रुरपणे मारलं गेलं, आता कोणत्या देवाकडे साकडं घालावं, न्याय मिळेल का?" यावेळी त्यांचे डोळे पाणावले. त्या पुढे म्हणाल्या, "माझं लेकरू त्या दिवशी मला बोलून गेलं, त्याची काही चूक नव्हती. थोडी मारहाण झाली असती तरी चाललं असतं, पण इतकी क्रूरता सहन करणे अशक्य आहे. त्याला किती वेदना झाल्या असतील, त्याने ती कशी सहन केली असेल, हे विचार करूनही मन हेलावून जाते." तसेच आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केलीये."

पत्नी म्हणते - विचारपूस करायला रोज कुणीतरी येतं, पण...

त्यांच्या पत्नीने सांगितलं, "मी आधी मुलगी वैष्णवी आणि मुलगा विराज यांना घेऊन लातूरला राहत होते. हत्येनंतर सर्वच गावी आलो. रोज कुणीतरी येतंच, कधी एखादा नेता, अधिकारी तर कधी समाजसेवी. गावात बाहेरगावाहून कोणी आले तरी घराचा पत्ता विचारतो, भेटतो, विचारपूस करतो आणि जातो; पण न्याय अजूनही मिळत नाही.

का केली हत्या?

संतोष देशमुख यांच्या हत्येमागे पवनचक्की प्रकल्पाशी संबंधित वाद कारणीभूत असल्याचे त्यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी सांगितले. धनंजय देशमुख यांच्या माहितीनुसार, ६ डिसेंबरला काही जण खंडणी मागण्यासाठी मस्साजोग येथील पवनचक्की प्रकल्पातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला करत होते. त्या प्रकल्पावर काम करणारे सुरक्षा रक्षक मस्साजोगचे स्थानिक असल्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांनी या घटनेत मध्यस्थी केली आणि मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या वादाचा परिणाम म्हणून ९ डिसेंबरला संतोष देशमुख यांचे अपहरण करून क्रूर हत्या करण्यात आली.

न्यायप्रक्रियेची स्थिती

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाची सध्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आतापर्यंत २० सुनावण्या पार पडल्यात. सात आरोपींनी दोषमुक्तीचे अर्ज केले होते, परंतु ते फेटाळून लावले गेले आहेत. पुढील सुनावणी १२ डिसेंबर रोजी होणार आहे. कुटुंबीय आणि ग्रामस्थ आतुरतेने न्याय मिळण्याची वाट बघत आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग 'मिसिंग लिंक': सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आता नवा सामना; रोड केबल-स्टेड ब्रिजसाठी आव्हानात्मक अभियांत्रिकी काम

Goa Nightclub Fire Update : नाईटक्लबच्या अग्नितांडवानंतर गोवा सरकारचा मोठा निर्णय; ‘रोमिओ लेन’वर बुलडोझर

"लाडकी बहीण योजनेचा उल्लेख कराल, तर..."; नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीसांनी भाजप आमदाराला सुनावले

"आम्ही घरातच शत्रू..."; अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडीओवरून महेंद्र थोरवेंचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Phaltan Doctor Suicide: महिला डॉक्टरच्या हातावरील हस्ताक्षर तिचेच; मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत मोठा खुलासा