एकीकडे नवजात बाळाचा जन्म, दुसरीकडे जवान पतीचे अंत्यदर्शन; साताऱ्यातील काळीज पिळवटून टाकणारा Video व्हायरल 
महाराष्ट्र

एकीकडे नवजात बाळाचा जन्म, दुसरीकडे जवान पतीचे अंत्यदर्शन; साताऱ्यातील काळीज पिळवटून टाकणारा Video व्हायरल

अंत्यदर्शनावेळी प्रमोद जाधव यांची पत्नी स्ट्रेचरवर आहे. शरीर वेदनेत आहे, मन मात्र अधिकच कोलमडलं आहे. तिचा आक्रोश ऐकून सर्वच स्तब्ध झाले. नातेवाईकांच्या हातात तिची नवजात लेक आहे. तिला अजून कळतही नाही, आपण नेमकं काय गमावलं आहे…

Mayuri Gawade

नशीब किती क्रूर असू शकतं, याचं जिवंत उदाहरण सातारा तालुक्यातील दरे गावात पाहायला मिळालं. ज्या लेकीने अवघ्या काहीच तासांपूर्वी जन्म घेतला, तिला वडिलांच्या कुशीत जाण्याआधीच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी यावं लागलं. घरात आनंद यायच्या आधीच शोककळा पसरली. या हृदयद्रावक क्षणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बायकोच्या प्रसुतीसाठी सुट्टीवर आलेले जवान

भारतीय सैन्य दलात सिकंदराबाद-श्रीनगर येथे कार्यरत असलेले वीर जवान प्रमोद परशुराम जाधव हे पत्नीच्या प्रसूतीसाठी सुट्टीवर गावी आले होते. आई नसल्यामुळे पत्नीच्या प्रसूतीसाठी ते आठ दिवसांपूर्वी सुट्टीवर आले होते. बाळ होणार, घरात नवीन आनंद येणार, कुटुंब एकत्र असणार… अशी कितीतरी स्वप्नं त्यांनी पाहिली असतील. पण काळाने घात केला. काही कामानिमित्त दुचाकीवरून वाढे फाट्याकडे जात असताना पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की प्रमोद जाधव यांचा जागीच मृत्यू झाला आणि क्षणात सगळं संपलं.

अपघाताची बातमी गावात पोहोचताच दरे गावासह संपूर्ण परळी खोऱ्यावर शोककळा पसरली. प्रमोद जाधव यांचे पार्थिव गावी आणण्यात आले. त्याच वेळी रुग्णालयात त्यांच्या पत्नीने एका गोंडस लेकीला जन्म दिला. एका बाजूला नव्या जीवाला जन्म दिला, तर दुसऱ्या बाजूला आयुष्यभराचा सोबती कायमचा हरपला, काय वाटलं असेल त्या पत्नीला…

ओली बाळंतीण तान्ह्या बाळासह स्ट्रेचरवर आली...

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतं की, अंत्यदर्शनावेळी प्रमोद जाधव यांची पत्नी स्ट्रेचरवर आहे. शरीर वेदनेत आहे, मन मात्र अधिकच कोलमडलं आहे. तिचा आक्रोश ऐकून सर्वच स्तब्ध झाले. नातेवाईकांच्या हातात तिची नवजात लेक आहे. तिला अजून कळतही नाही, आपण नेमकं काय गमावलं आहे… पण त्या आईच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये सगळं काही स्पष्ट दिसत आहे. पत्नी आणि नवजात लेकीचा हा प्रसंग दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो पाहताना अनेकांना अश्रू अनावर होत आहेत.

प्रमोद जाधव यांच्यावर शासकीय इतमामात मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रशासनातील अधिकारी, माजी सैनिक, नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या वीर जवानाच्या अकाली जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

इस्रोच्या PSLV-C62 मोहिमेला धक्का; प्रक्षेपणानंतर रॉकेटवरील नियंत्रण सुटले, १६ उपग्रह अंतराळात हरपले

Payal Gaming MMS Case : महाराष्ट्र सायबरची डीपफेक क्लीप अपलोड करणाऱ्यांवर कारवाई, आरोपींनी जाहीर माफीही मागितली - Video

४ दिवसांपूर्वीच जामिनावर सुटून घरी आला आणि… ; परभणी संविधान शिल्प विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता पवारची आत्महत्या

Thane Traffic Update : राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या संयुक्त सभेमुळे आज वाहतुकीत मोठे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

डोनाल्ड ट्रम्प 'व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'; स्वतःच केले जाहीर; ट्रुथ सोशलवरील पोस्टने खळबळ