कराड : डफडे, ताशा, शिंग आणि तुतारीच्या गजरात हातवारे, टाळ्यांचा कडकडाट आणि एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहत साताऱ्यातील सुखेड आणि बोरी गावांतील सुमारे ३०० महिलांनी मंगळवारी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक ‘बोरीचा बार’ घालत शेकडो वर्षांची अनोखी परंपरा उत्साहात जपली. जोरदार घोषणांसह शिव्यांची लाखोली वाहिल्याने परिसर दणाणून गेला होता. सुमारे तासभर रंगलेल्या या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
साताऱ्याच्या खंडाळा तालुक्यातील सुखेड आणि बोरी या दोन गावांच्या सरहद्दीवर असलेल्या ओढ्यात नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजल्यानंतर दोन्ही गावांतील महिला एकत्र येतात. ओढ्याच्या दोन्ही बाजूंना उभे राहून हातवारे, टाळ्यांचा कडकडाट आणि पारंपरिक पद्धतीने एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहत ‘बोरीचा बार’ घातला जातो. पिढ्यान्पिढ्या सुरू असलेली ही परंपरा यंदाही कायम राहिल्याने महिलांमध्ये मोठा उत्साह होता.
मंगळवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास सुखेड गावातील महिला डफडे, ताशा, शिंग, तुतारी आदी पारंपरिक वाद्यांच्या गजरात वाजतगाजत ओढ्याच्या काठावर दाखल झाल्या. हातवारे आणि टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांनी ‘बोरीचा बार’ सुरू केला.काही वेळातच बोरी गावातील महिलांचा मोठा समूह वाजतगाजत ओढ्याकडे दाखल झाला आणि दोन्ही बाजूंच्या महिलांमध्ये पारंपरिक ‘बार’ रंगला.सुमारे तासभर हा सोहळा रंगला.
पावसातही उत्साह कायम
यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने दोन्ही गावांच्या सरहद्दीवरील ओढ्यात पावसाचे पाणी वाहत होते. त्यामुळे पाण्यात उभे राहून महिलांनी उत्साहात ‘बार’ घातला. गर्दी वाढल्याने महिला आणि बघ्यांना आवरण्यासाठी पोलीस व ग्रामस्थांची धावपळ उडाली. मात्र, वाद्यांचा आवाज बंद झाल्यानंतरही महिलांनी टाळ्या वाजवत आणि हातवारे करीत ‘बार’ सुरूच ठेवला.
बारनंतर झिम्मा-फुगडीचा फेर
‘बोरीचा बार’ संपल्यानंतर सुखेड आणि बोरी गावांतील महिलांनी गावात परतल्यानंतर झिम्मा-फुगडी, फेर आदी पारंपरिक खेळ खेळून उत्सवाचा आनंद लुटला. सुखेडच्या माळावर पाळणे, मेवा-मिठाई, स्टेशनरी आदी वस्तूंची दुकाने थाटण्यात आल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.