कराड : 'एल-निनो'च्या प्रभावी अडथळ्यामुळे यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावरतीच पावसाने हात आखडता घेतल्याने यंदा अनेक देश भीषण दुष्काळाच्या खाईत लोटले गेले आहेत. त्यातच, आपल्या देशातही 'एल-निनो'च्या प्रभावामुळे प्रतिवर्षी कोसळणारा नैऋत्य मोसमी पाऊस यावर्षी सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पडल्याने पाणीसाठ्यांसह जमिनीतील जलपातळीवरही गंभीर परिणाम झाला आहे. यावर्षीचा नैऋत्य मोसमी पाऊस आता परत फिरल्याने पावसाच्या उरल्या-सुरल्या आशाही मावळल्या आहेत.
महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागातून मान्सूनने माघार घेतल्याने साताऱ्याच्या पश्चिमेकडील भाग पावसाचे आगार म्हणून प्रसिद्ध असला तरी उर्वरित जिल्हा दुष्काळाच्या झळा अनुभवत आहे. यंदाच्या जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या कालावधीत सरासरीच्या ५० टक्के पेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात केवळ शेतीचेच नव्हे तर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्यही मोठ्या प्रमाणात जाणवणार असून भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे त्यासाठी शासनाने पिण्याच्या पाण्यासह शेत पिकांना अत्यावश्यक असणारा पाणी पुरवठा व जनावरांच्या चाऱ्यासाठीची उपाययोजना आतापासूनच करण्यात यावी अशी मागणी दुष्काळग्रस्त तालुक्यांतून होत आहे.
सर्वात कमी पावसाचा २००१ नंतरचा चौथा हंगाम
हवामान विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, सध्या परतीच्या मान्सूनची रेषा ही परभणी, ब्रह्मपुरी, बारामती आणि हर्णे या भागांमधून जात आहे. अर्धा कोकण, मध्य व पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांतून मान्सून परतला आहे. सन २००१ नंतरचा हा चौथा सर्वात कमी पावसाचा मान्सून हंगाम ठरल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाणी, जनावरांचा चारा व अन्नधान्याला 'सोन्याची किंमत येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
जलसाठे, भूजल पातळी, पिकांची चिंता वाढली
पूर्वेकडील राज्यातील अनेक जिल्ह्यांप्रमाणेच सातारा जिल्ह्यातही विशेषतः कायम दुष्काळी माण, खटाव, फलटण, खंडाळा या तालुक्यांत पावसाने दडी मारल्याने जलसाठे, भूजल पातळी आणि खरीप पिकांबाबत चिंता वाढली आहे. माण, खटावमध्ये सर्वाधिक पावसाची तूट नोंदली गेली आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने परिणामी सिंचनासाठीही पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होईल कि नाही? याबाबत बळीराजाची चिंता वाढली आहे. सातारा जिल्ह्यातील कोयनेसह अनेक धरणांमध्ये अपेक्षित जलसाठा नाही. त्यातच परतीच्या पावसाने 'सुट्टी' घेतल्याने आगामी काळात पाणीटंचाई हे मोठे आव्हान ठरणार आहे.
उपलब्ध पाणी साठा जपून वापरणे क्रमप्राप्त
सातारा जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांतून भागातून मान्सूनची माघार झाल्याने आगामी काळात पाणीसाठा व भूगर्भातील जलपातळी उंचावणे अशक्य झाले आहे. परिणामी उपलब्ध पाणी साठा जपून वापरणे प्रत्येक कुटुंबाला व कुटुंबातील प्रत्येकाला क्रमप्राप्त झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यातून मान्सून परतल्याने जिल्ह्यात प्रचंड मोठी पावसाची तूट निर्माण झाली आहे. हाता-तोंडाला आलेली खरीप व बागायती पिके वाळून जाऊ लागली आहेत. त्याचा उत्पन्नावर व जनावरांच्या चाऱ्यावर थेट परिणाम होणार आहे. पूर्वेकडील तालुक्यांतील दुष्काळ आणि पाणीटंचाईची चिंता सर्वाधिक वाढली आहे. त्यातच अनेक तालुक्यांनाच दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून शासनाने वगळल्याने कराडसह सातारा, कोरेगाव, जावळी आणि वाई या तालुक्यांचा तातडीने दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश करण्याची मागणी होत आहे.
अपुऱ्या सर्वेक्षकांच्या संख्येमुळे ताण
कृषी राज्य सरकारच्या निर्णयानुसार माण, खटाव तालुक्यातील प्रत्येक गावात खरीप हंगाम दुष्काळ सर्वेक्षणास प्रारंभ झाला आहे. संबंधित तहसीलदार, तालुका अधिकारी, मंडलाधिकारी, गाव कामगार तलाठी व सर्वेक्षक गावा गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत आहेत, तसेच अपुऱ्या सर्वेक्षक संख्येमुळे सर्वेक्षणाच्या कामावर चांगलाच ताण येत असल्याची शेतकऱ्यांच्यात चर्चा आहे.