कराड : सातारा येथे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू असतानाच शनिवारी तिसऱ्या दिवशी या संमेलनाला एका हिंसक घटनेने गालबोट लागले असून गेल्या दोन दिवसांपासून अत्यंत उत्साहात सुरू असलेल्या या संमेलनात शनिवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी हे प्रकाशन कट्ट्यावरचा कार्यक्रम आटोपून व्यासपीठावरून खाली येत असतानाच प्रज्ञा सूर्य सामाजिक संस्थेचा अध्यक्ष संदीप जाधव (४२, रा. तांदुळवाडी ता. कोरेगाव) याने तेथे येऊन कुलकर्णी यांच्यावर अचानक हल्ला चढवला व त्यांच्या तोंडाला काळे फासले. या हल्ल्यातून ते बचावले असले तरी त्यांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. हल्लेखोर जाधव याने कुलकर्णी यांना जीवे मारण्यासह उर्वरित साहित्य संमेलन तू घेतोच कसे ते बघतो, अशी धमकीही दिल्याने साताऱ्यासह साहित्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला फासले काळे
शाहूपुरी पोलिसांकडे दाखल झालेल्या फिर्यादीनुसार शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास विनोद कुलकर्णी हे साहित्य संमेलनाच्या नियोजित प्रकाशन कट्ट्यावरचा कार्यक्रम आटोपून व्यासपीठावरून खाली येत असतानाच प्रज्ञा सूर्य सामाजिक संस्थेचा अध्यक्ष संदीप जाधव याने त्याच्याजवळील काळ्या रंगाची पावडर विनोद कुलकर्णी यांच्या तोंडावर टाकली. त्या पावडरमुळे विनोद कुलकर्णी यांच्या डोळ्याला जळजळ होऊ लागली. तसेच 'तू संमेलन घेतोच कसे, मी बघतोच', अशी दमदाटीची भाषा वापरत जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र त्याचवेळी अचानक घडलेल्या या घटनेमुळे संमेलनस्थळी एकच गोंधळ उडाला. परंतु प्रसंगावधान राखत तेथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जाधव याला ताब्यात घेत त्याची पोलीस ठाण्यात रवानगी केली.
पोलिसांनी संशयितास घेतले ताब्यात
विशेष म्हणजे संशयित संदीप जाधव याने कुलकर्णी यांच्यावर भ्याड हल्ला केल्यानंतर संमेलन स्थळावरच 'जय जवान जय किसान' म्हणत तिथेच राष्ट्रगीत गायला प्रारंभकेला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे संमेलन स्थळावरील सर्व निमंत्रित सारस्वत आणि रसिक श्रोते आवाक झाले. तसेच पोलिसांनी संशयितास ताब्यात घेऊन तेथील गोंधळाचे वातावरण शांत केले.
साहित्यप्रेमींनी केला घटनेचा निषेध
दरम्यान, या प्रकाराचा सर्व साहित्यप्रेमींनी निषेध केला असून साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही असले प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. विविध पत्रकार संघटनांनीही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून याची पाळेमुळे शोधून काढण्याची मागणी केली आहे.
कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी सर्व साहित्यिक महामंडळाचे पदाधिकारी, श्रोते, पत्रकार व जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले असून यापुढेही अशा हल्ल्यांना भीक न घालता जीव गेला तरी बेहत्तर मी माझी साहित्य सेवा अशी अखंडपणे सुरूच ठेवणार असल्याची, ग्वाही दिली. मी असल्या भ्याड हल्ल्याला भीक घालत नाही. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी माझे विविध मार्गातून प्रयत्न सुरू आहेत. हिंदी भाषा शक्ती आणि साहित्य क्षेत्रामध्ये राजकारणाचा हस्तक्षेप असू नये अशा दोन मुद्द्यावर माझी संघर्षाची भूमिका आहे. कदाचित या संदर्भाने संमेलन उधळण्याचा काही जणांचा प्रयत्न असावा. मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने फारसे काही घडले नाही. असे काही घडेल याची कल्पना नव्हती. या प्रकरणाच्या तळाशी पोलीस नक्कीच जातील. त्यांच्या तपास यंत्रणेवर माझा विश्वास आह. मी मराठी भाषेचा सच्चा सेवक आहे. यामध्ये कोणतीही तडजोड नाही, प्रसंगी प्राण गेला तरी बेहत्तर; मराठी भाषेच्या संदर्भातील साहित्य सेवा मी कधी सोडणार नाही', असेही कुलकर्णी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.