महाराष्ट्र

आता चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर; राज्य सरकारचा निर्णय, सर्व शाळांना लागू होणार नियम

पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतची मुले लहान असतात. त्यांना अनेक ठिकाणी सकाळी ७ वाजता शाळेत पोहोचावे लागते.

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई: राज्यातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या शाळा आता सकाळी ९ किंवा त्यानंतर भरविण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना वेळापत्रकातील हा बदल लागू असणार आहे. राज्य सरकारने याबाबतचे परिपत्रक काढले आहे. याआधी अनेक ठिकाणी हे वर्ग सकाळी ७ वाजता भरविण्यात येत होते. मात्र, लवकर उठण्यामुळे लहान मुलांना होणारा त्रास लक्षात घेता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे.

पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतची मुले लहान असतात. त्यांना अनेक ठिकाणी सकाळी ७ वाजता शाळेत पोहोचावे लागते. लवकर उठावे लागत असल्याने मुलांना याचा त्रास होतो. त्यामुळे या मुलांच्या शाळांची वेळ बदला, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात केली होती. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने याची दखल घेत अभ्यास केला. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून हा अभ्यास करण्यात आला. त्यासाठी अभिप्राय नोंदविण्यासाठी गुगल लिंकही देण्यात आली होती. शिक्षणतज्ज्ञ, पालक, प्रशासनातील अधिकारी यांनी देखील आपली शिफारस नोंदविली होती.

त्यामुळे सकाळची सातची शाळा गाठायची असेल तर लवकर उठावे लागते. अनेकदा झोप व्यवस्थित होत नसल्याने लहान मुले लवकर उठण्यास कंटाळा करतात. पण, शाळा वेळेतच गाठायची असल्याने पालक त्यांना लवकर उठवितात. अशामुळे या लहान मुलांना दिवसभर आळस राहतो. याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या मानसिक तसेच शारीरिक आरोग्यावर होताना दिसून येत होता.

राज्य सरकारने याची दखल घेत आता हा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांना आता पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग हे सकाळी ९ वाजता किंवा सकाळी ९ नंतरच भरविण्याचे निर्देश दिले आहेत. शाळांच्या वेळेत बदल करताना शासकीय तसेच निमसरकारी कार्यालयांच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाहीत याचीही काळजी घेण्याचे सरकारने सुचविले आहे.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश