शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा लढा अटळ; जयंत पाटील, राजू शेट्टींचा इशारा; सांगलीत २१ ऑगस्टला विराट मोर्चाचे आयोजन 
महाराष्ट्र

शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा लढा अटळ; जयंत पाटील, राजू शेट्टींचा इशारा; सांगलीत २१ ऑगस्टला विराट मोर्चाचे आयोजन

सांगलीत बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी येत्या २१ ऑगस्टला सांगलीत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

Swapnil S

सांगली : राज्य सरकारच्या नियोजित 'शक्तिपीठ महामार्गा'ला होणारा विरोध आता अधिक तीव्र झाला आहे. या प्रकल्पाविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून, सांगलीत बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी येत्या २१ ऑगस्टला सांगलीत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

महामार्गाविरोधात जनतेच्या मनात तीव्र रोष...

पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी मोर्चाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘शक्तिपीठ महामार्गाविरोधात जनतेच्या मनात तीव्र रोष आहे. जनतेच्या याच भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी २१ तारखेला सकाळी ११ वाजता सांगलीत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महामार्ग होऊ नये यासाठी ज्या-ज्या भागांतून हा रस्ता जाणार आहे, तिथे याआधीही अनेक मोर्चे काढण्यात आल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

राजू शेट्टींचा सवाल

पत्रकार परिषदेत राजू शेट्टी यांनी अतिशय आक्रमक भाषेत राज्य सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘आता आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही. सरकारने आमच्याशी नाही, तर किमान शेतकऱ्यांसोबत तरी चर्चा करायला हवी होती’. प्रकल्पाच्या खर्चावर गंभीर आरोप करताना शेट्टी म्हणाले, ‘जो रस्ता ४५ हजार कोटींमध्ये होणार होता, तो आता १ लाख १० हजार कोटी रुपयांत करायचा घाट घातला जात आहे.

सुविधांचा अभाव अन् टोलचा सुळसुळाट

राज्यातील इतर प्रश्नांकडे लक्ष वेधताना शेट्टींनी सरकारला खडे बोल सुनावले. ‘राज्यातील सरकारी दवाखान्यांची वाईट अवस्था जाऊन बघा. सरकारकडून जनतेला साध्या मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. दुसरीकडे, राज्यात हळूहळू टोलनाक्यांची संख्या एवढी वाढली आहे की, आता सरकारने नेमकं करायचं काय?’ असा संतप्त सवाल त्यांनी केला.

लढा अटळ, तरुणही होणार सहभागी

आंदोलनात शेतकरी, जनतेसोबतच तरुण पिढीही उतरणार असल्याचे शेट्टींनी स्पष्ट केले. ‘आमच्या या मोर्चात ‘झेन-झी’ म्हणजेच आजची तरुण पिढीही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. समाजाप्रती आमचीही काही जबाबदारी आहे, त्यामुळे आम्ही मागे हटणार नाही. जोपर्यंत हा शक्तिपीठ महामार्ग रद्द होत नाही, तोपर्यंत आमचा लढा अटळ आहे’, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

SIR विरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार; CJP च्या आंदोलनाला पाठिंबा, ४ ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त मोर्चा

...तर ठाण्यातील क्लस्टरवर विश्वास कसा ठेवायचा? केदार दिघेंचा महापालिकेला सवाल

Kolhapur : भरधाव Ertiga ची दुचाकीला जबर धडक; पती-पत्नी थेट हवेत; एकजण जागीच ठार, अंगावर काटा आणणारा Video व्हायरल

Mumbai : १४ फूट उंच झोपड्यांच्या कारवाईवरून विरोधक आक्रमक; काँग्रेस, ठाकरेंच्या शिष्टमंडळांनी घेतली आयुक्तांची भेट

फिल्मसिटीतील मैदानाला GMLR चा फटका; १७४ कोटी नुकसानभरपाई देण्याची महामंडळाची मागणी, BMC कडून २० कोटी देण्याचा प्रस्ताव