सोलापूर : राज्यात प्रस्तावित असलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या असंतोषाचा मोठा भडका उडाला आहे. माढा आणि पंढरपूर तालुक्यात या महामार्गाविरोधात जोरदार आंदोलनाला सुरुवात झाली आहे. माढ्यात मंगळवारी या महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी विराट मोर्चा काढला, तर पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. ‘शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता बळाचा वापर करून जर महामार्ग लादण्याचा प्रयत्न केला, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आषाढी एकादशीला पंढरपुरात पाऊल ठेवू देणार नाही आणि महापूजेपासून रोखू,’ असा थेट आणि गंभीर इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.
द्राक्षबागा, फळपिके उद्ध्वस्त करू नका...
माढा येथील स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर शेतकरी संघटनांच्या वतीने माढा तहसील कार्यालयावर शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात घोषणाबाजी करत भव्य मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शेतकरी नेते संजय पाटील घाटणेकर यांनी शासनाला खडेबोल सुनावले. आमच्या द्राक्षबागा आणि फळपिके उद्ध्वस्त करून जर शक्तिपीठ महामार्ग केला तर त्याला टोकाचा विरोध केला जाईल, असा इशारा संजय पाटील घाटणेकर यांनी दिला आहे. तसेच, आगामी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेला मुख्यमंत्र्यांना पंढरपूरमध्ये पाय ठेवू न देण्याचा इशाराही त्यांनी दिला.
मोजणी न करताच अधिकारी फिरले माघारी
आजच पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे शक्तिपीठ महामार्गाच्या भू-संपादनासाठी मोजणी करण्यासाठी सरकारी अधिकारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त दाखल झाला होता. मात्र, मोजणीची कुणकुण लागताच शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांनी सरकारी अधिकारी आणि पोलीस फौजफाट्याला वेढा घालत जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहून प्रशासकीय अधिकाऱ्यांना अखेर मोजणी न करताच माघारी फिरावे लागले.
मार्ग बदलूनही विरोध कायम
यापूर्वी, नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रातून मोठा विरोध झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाचा मार्ग बदलण्याचे संकेत दिले होते. मात्र, तरीही नवीन रचनेत ज्या गावांमधून हा मार्ग जात आहे, तिथे शासन आणि प्रशासनाला शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहे. आता आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे राज्य सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे. आता या आंदोलनावर पडदा टाकण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा रोष शांत करण्यासाठी सरकार शक्तिपीठ महामार्गाबाबत काय मोठा निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.