

मुंबईत बुधवारी सकाळी झालेल्या पूर्व-मोसमी पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. सकाळच्या गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे BMC च्या मान्सूनपूर्व तयारीबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
बुधवारी सकाळी पश्चिम उपनगरांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. काही भागांत जोरदार सरी कोसळल्याने अंधेरी सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी ७.४० वाजता सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
पाणी साचल्याची माहिती मिळताच पालिका आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. तातडीने पाण्याचा निचरा करण्याचे काम हाती घेण्यात आले. सुमारे ४५ मिनिटांच्या प्रयत्नांनंतर पाण्याची पातळी कमी झाल्याने सकाळी ८.२४ वाजता सबवे पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
पश्चिम उपनगरांत सर्वाधिक पाऊस
BMC च्या आकडेवारीनुसार सकाळी ७ ते ८ या एका तासात पश्चिम उपनगरांमध्ये सरासरी ९.८४ मिमी पावसाची नोंद झाली. दक्षिण मुंबईत ०.९६ मिमी तर पूर्व उपनगरांत १.२५ मिमी पाऊस झाला.
वर्सोवा पंपिंग स्टेशन परिसरात सर्वाधिक ६९ मिमी पाऊस नोंदवण्यात आला. याशिवाय कूपर रुग्णालय परिसरात ५२ मिमी, के-पूर्व विभागात ४९ मिमी आणि के-पश्चिम विभागात ४६ मिमी पाऊस झाला.
मान्सूनपूर्व तयारीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप
अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्यानंतर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी X (पूर्वीचे Twitter) वर पोस्ट करत मुंबई महापालिकेवर टीका केली. "मुंबईत मान्सून अजूनही नीट दाखलही झालेला नाही, आणि काही सरी पडताच अंधेरी सबवे पाण्याखाली! हीच का मुंबई महापालिकेची नालेसफाई? कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचे दावे करणाऱ्या मुंबई महापालिकेची पोलखोल पहिल्याच पावसात झाली आहे. जर एवढ्याशा पावसाने ही अवस्था असेल, तर मुसळधार पावसात मुंबईकरांचे काय होणार? नालेसफाईचे पोकळ दावे आणि प्रशासनाची निष्क्रियता पुन्हा एकदा समोर आली आहे," असे त्यांनी म्हटले.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही या घटनेवरून पालिकेच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले. "ही मुंबई महानगरपालिकेची नालेसफाई! आज काही सरी बरसल्या आणि अंधेरी सबवे भरला. खरा पाऊस पडेल तेव्हा काय अवस्था होईल? ट्रिपल इंजिन लावून भाजप भ्रष्टाचार करत आहे हे स्पष्ट आहे. मुंबईकरांनो पावसाळ्याची वाट पाहत आहात ना! उन्हाळ्याच्या आगीतून पावसाळ्यात भाजपनिर्मित फुफाट्यात जाणार हे नक्की," अशी टीका त्यांनी केली.
मान्सूनपूर्व कामांवर प्रश्न
गेल्या काही आठवड्यांपासून BMC कडून नालेसफाई, गाळ काढणे, कचरा हटवणे आणि पावसाळ्यापूर्वीची विविध कामे करण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र मान्सून सुरू होण्यापूर्वीच झालेल्या पावसात अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याने या कामांच्या परिणामकारकतेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांत मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगर प्रदेशात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ४ जूनपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून प्रशासनाने संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवले आहे.