महाराष्ट्र

‘शक्तिपीठ’ चा खर्च १ लाख कोटी; महामार्ग आता १२ ऐवजी १३ जिल्ह्यांतून जाणार

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'शक्तिपीठ' महामार्गाच्या आखणीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) बदल केला आहे.

Swapnil S

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'शक्तिपीठ' महामार्गाच्या आखणीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) बदल केला आहे. या बदलात भूसंपादनासाठी विरोध असलेल्या कागल आणि हातकणंगले तालुक्याचा मोठा भाग वगळण्यात आला आहे. याशिवाय हा महामार्ग १२ ऐवजी आता १३ जिल्ह्यांतून जाणार असल्याने शक्तिपीठच्या खर्चात तब्बल १५ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी प्रकल्पाचा खर्च ८६ हजार कोटींवरून १ लाख १ हजार कोटींवर पोहचला आहे.

वर्धा जिल्ह्यातील पवनार ते गोव्यातील पात्रादेवीला जोडणाऱ्या शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला होता. हा विरोध लक्षात घेऊन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने महामार्ग प्रकल्पाच्या आखणीत बदल करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार एमएसआरडीसीने महामार्गाच्या आखणीत बदल करून सुधारित प्रस्ताव राज्य सरकारच्या मान्यतेसाठी पाठवला आहे. मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या प्रस्तावाची तपासणी सुरू आहे.

सुरुवातीच्या नियोजनानुसार शक्तिपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, शिरोळ, हातकणंगले, कागल येथून जाणार होता. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे बहुतांश भाग यातून वगळण्यात आला आहे.

शनिवारपासून समृद्धी महामार्गावर ब्लॉक

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर वाशिम व बुलढाणा जिल्ह्यात गॅन्ट्री उभारण्यासाठी ७ ते २३ फेब्रुवारीपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. हे काम ३५ टप्प्यांत प्रस्तावित आहे. वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये ही कामे करण्यात येणार असून प्रत्येक संबधित वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांच्या कालावधीकरिता पूर्ण थांबविण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यातील तालुका कारंजा (लाड), तालुका मंगरूळपीर, तालुका मालेगांव आणि बुलढाणा जिल्ह्यातील तालुका मेहकरमधून जाणाऱ्या १७८+९०० ते कि.मी. २९०+४०० दरम्यान महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमअंतर्गत ही गॅन्ट्री उभारली जाणार आहे. या कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत संबंधित ठिकाणी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यावर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल. महामंडळाने ब्लॉकचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

शक्तिपीठ महामार्ग

  • महामार्गाच्या आखणीत बदल झाल्याने ८०२ किमीचा महामार्ग आता ८५६ किमीचा होणार

  • प्रकल्पाच्या भूसंपादनाचा खर्च राज्य सरकार उचलणार, भूसंपादनासाठी कर्ज घेणार

  • ३९५ गावांपैकी १४६ गावांची संयुक्त जमीन मोजणी पूर्ण

  • अंबाबाई (कोल्हापूर), तुळजापूर (धाराशिव ), माहूर (नांदेड) शक्तिपीठे जोडली जाणार

मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार नाही! प्रफुल्ल पटेल यांची स्पष्टोक्ती

तटकरेंच्या प्रदेशाध्यक्ष पदावर येणार होते गंडांतर; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणातील अंतर्गत बाब उघड

मोदींनी देश अमेरिकेला विकला! व्यापार करारावरून राहुल गांधी यांचा घणाघात

व्यापार करारात देशाचे हित अबाधित! केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांची माहिती

"सॉरी पप्पा! मला माफ करा" चिट्ठी लिहून तीन सख्ख्या बहिणींची आत्महत्या; पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर