विशेष प्रतिनिधी/मुंबई
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार हालचाली सुरू केल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला आता तुतारी वाजविणारा माणूस हे पक्षचिन्ह बहाल झाल्याने शरद पवार गट सक्रिय झाला आहे. या पक्षचिन्हाचे थेट किल्ले रायगडावरून अनावरण करण्याचे ठरविण्यात आले असून त्यासाठी शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने शरद पवार गट थेट किल्ले रायगडावरून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि पक्षाचे अधिकृत चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्याने पक्ष स्थापन करूनही शरद पवार यांची अडचण झाली होती. दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असे पक्षाचे नाव मिळाले. दरम्यान, शरद पवार गटाने निवडणूक आयोगाच्या मूळ निर्णयाला थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांना दिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव पुढील सुनावणीपर्यंत कायम ठेवताना शरद पवार यांच्या पक्षाला तात्काळ निवडणूक चिन्ह बहाल करावे, असा आदेश निवडणूक आयोगाला दिला. त्यानुसार शरद पवार गटाने केलेल्या मागणीनुसार गुरुवारी त्यांच्या गटाला तुतारी वाजविणारा माणूस हे पक्षचिन्ह मिळाले. ऐन निवडणुकीच्या पुढे हे पक्षचिन्ह मिळाल्यामुळे शरद पवार गटाने आता निवडणुकीची तयारी करण्याच्या दृष्टीने थेट किल्ले रायगडावर कार्यक्रम घेण्याचे ठरविले आहे.
पक्षचिन्हाचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार व्हावा, या उद्देशाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाने आता जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी शनिवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी किल्ले रायगडावर पक्षचिन्हाच्या अनावरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर थेट ऐतिहासिक किल्ले रायगडावरून शरद पवार आगामी लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी सर्व नेते, पदाधिकारी कामाला लागले आहेत. या कार्यक्रमाचे टिझरही शरद पवार गटाच्या एक्स खात्यावर प्रदर्शित करण्यात आले असून, या टिझरमध्ये शरद पवारसाहेबांच्या साथीने विकासाचे रणशिंग फुंकले जाणार आहे, असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. त्यावरून शरद पवार गट आता जोरदार तयारीला लागल्याचे चित्र आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीपर्यंत तुतारी वाजविणारा माणूस हे पक्षचिन्ह कायम राहणार आहे. खा. अमोल कोल्हे यांच्या आवाजातील या टिझरमध्ये आता अवघा देश होणार दंग, शरद पवार यांच्या साथीने फुंकले जाणार विकासाचे रणशिंग, असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हा पक्ष आता पक्षचिन्ह अनावरणाच्या निमित्ताने थेट रायगडावरून आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे, हेच यावरून ध्वनित होते. पक्षचिन्ह मिळताच शरद पवार गट आता चांगलाच कामाला लागल्याची चिन्हे आहेत. शरद पवार गटाला तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह मिळताच शरद पवार यांचा आणखी एक नातू आणि अजित पवार यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार आता सक्रिय झाला असून, दिल्लीपुढे न झुकण्याचा छत्रपती शिवरायांनी शिकविलेला स्वाभिमानी बाणा जपण्यास आता सज्ज झालो आहोत, असे म्हटले. त्याने थेट फेसबुक पोस्ट केली असून, युगेंद्र पवार आता थेट आपले चुलते अजित पवार यांच्याविरोधात भूमिका घेण्यास सज्ज झाले आहेत.