महाराष्ट्र

या बंद दाराआड चर्चेत घडलंय काय? शरद पवार, एकनाथ शिंदे यांच्यात तासभर बैठक

गिरीश चित्रे

गिरीश चित्रे/मुंबई

मराठा आरक्षणावर आपण मध्यस्थी करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी नुकतीच भेट घेत शरद पवारांना गळ घातली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘सह्याद्री’ अतिथीगृहात भेट घेतली व तब्बल एक तास बंद दाराआड चर्चा केली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे समोर आले नाही, मात्र ओबीसी, मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकारणात राजकीय समीकरणे कधी बदलतील याचा नेम नाही. त्यामुळे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावर पुढील सरकार कुणाचे येणार हे ठरणार असल्याने सर्वच पक्ष आपणच मराठा समाज व ओबीसींचे कैवारी असल्याचा आव आणत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. छगन भुजबळ आणि मराठा आरक्षणाचे नेते जरांगे पाटील यांच्यात नेहमीच खटके उडत आहेत.

मराठा आरक्षणाचा मुद्दा हाताळण्याची क्षमता शरद पवार यांच्याकडे असून शरद पवार यांनी याप्रकरणी मध्यस्थी करावी यासाठी छगन भुजबळ यांनी ‘सिल्व्हर ओक’ या शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यापूर्वी, भुजबळ यांनी मराठा आरक्षणावरून शरद पवारांनाच टार्गेट केले होते. मात्र, पवारांवरील वार आपल्या अंगाशी येणार हे लक्षात येताच त्यांनी पवारांच्या घरी धाव घेऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शरद पवारांनी भुजबळ यांना भेटीसाठी तासभर तिष्ठत ठेवले होते.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण सध्या तापले आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी ।पुन्हा एकदा सरकारला तीव्र इशारा दिला आहे. मनोज जरांगे हे पुन्हा एकदा शनिवारपासून उपोषणाला बसले असून, त्यांच्या उपोषणाचा सोमवारी तिसरा दिवस होता. जरांगेच्या उपोषणामुळे राज्य सरकार पुन्हा कोंडीत सापडले आहे. त्यामुळे पवार त्यांना या कोंडीतून सोडवणार की नवी खेळी खेळणार याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.

दरम्यान, सिंचन, दुधाची दरवाढ आणि साखर कारखान्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर या भेटीत चर्चा झाली, असे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सांगण्यात आले.

मराठा, ओबीसी आरक्षणावर चर्चा की...?

या भेटीनंतर भुजबळ यांनी, ‘शरद पवार हे जाणते राजकारणी आहेत. त्यांना महाराष्ट्र व केंद्रातील राजकारणाची चांगलीच माहिती आहे. त्यामुळे मराठा आरक्षण मुद्द्यावर त्यांनी मध्यस्थी करावी, यासाठी भेट घेतल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर, सोमवारी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘सह्याद्री’ अतिथीगृहात भेट घेतली. या भेटीत ओबीसी व मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ही भेट आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी तर नसावी ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था