जळगाव : महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांची यादी प्रमोद महाजन आणि एकनाथ खडसे यांची नावे घेतल्याशिवाय पूर्ण होणार नाही. महाराष्ट्रात भाजपचे राजकीय अस्तित्व मर्यादित असताना हा पक्ष तळागाळात रुजविण्यासाठी ज्या नेत्यांनी सातत्याने मेहनत घेतली, त्यामध्ये प्रमोद महाजन आणि एकनाथ खडसे यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त कोथळी, ता. मुक्ताईनगर येथे खडसे परिवार आणि अमृत महोत्सव समितीच्या वतीने पक्षविरहित कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार बोलत होते. या सोहळ्यास राज्यभरातून खडसे समर्थक, मित्रपरिवार आणि विविध राजकीय पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, ज्येष्ठ नेते रामदास आठवले, शेकापचे जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, महादेव जानकर, शशिकांत शिंदे, खासदार भास्कर भगरे, माजी मंत्री अनिल देशमुख, दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, मंदाताई खडसे, आमदार रोहिणी खडसे, शारदा खडसे आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना एकनाथ खडसे अनेकदा भावूक झाले. माझा मुलगा गमावल्यानंतर राजकारण सोडण्याच्या मनःस्थितीत होतो. मात्र, कुटुंबीयांनी धीर दिला. तुम्हा सर्वांनीही आधार देत मला उभे केले, असे सांगताना त्यांनी आपल्या राजकीय प्रवासातील आठवणींना उजाळा दिला.
एदलाबादचे मुक्ताईनगर असे नामकरण करणे ही आपल्या राजकीय कारकिर्दीतील सर्वांत मोठी घटना असल्याचे खडसे यांनी सांगितले. तापी विकास महामंडळाच्या स्थापनेपासून विविध विकासकामांचा उल्लेख करताना आजही जिल्ह्यातील निम्मा भाग कोरडवाहू असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राजकीय जीवनात अनेक उलथापालथी झाल्या. शरद पवार साहेबांनी मला हात दिला. अनेक मित्र मिळाले आणि त्यांनी पक्षविरहित प्रेम दिले. आयुष्यात माणसे जोडली, चांगली कामे केली; हातून चुका झाल्या असतील तर त्याबद्दल माफी मागतो. मात्र, हे प्रेम कायम टिकवून ठेवा, असे आवाहन करत खडसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
विविध पक्षांच्या नेत्यांनी यावेळी एकनाथ खडसे यांचा सत्कार केला. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी स्वागताध्यक्ष म्हणून प्रास्ताविक केले. उपस्थित मान्यवरांनी खडसे यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा गौरव करत मनोगते व्यक्त केली.
‘माझे राज्य’ या दृष्टिकोनातूनच निर्णय
सार्वजनिक कामांसाठी निधी देताना आपण कधीही राजकीय भेदभाव केला नाही, असेही खडसे यांनी स्पष्ट केले. संत मुक्ताई मंदिर प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद असून, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ कोटी रुपये मंजूर केले होते. त्यापैकी केवळ नऊ कोटी रुपये मिळाले. त्यानंतर निधी मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राजकारण करताना ‘माझा पक्ष’ नव्हे, तर ‘माझे राज्य’ हा दृष्टिकोन ठेवून निर्णय घेतले. त्यामुळे विविध राजकीय पक्षांची मदत मिळाली. विरोधी पक्षात असतानाही सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी विकासकामांसाठी सहकार्य केले, असे खडसे म्हणाले. २०१४ पूर्वी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील संबंध अधिक निर्मळ होते, त्यांना राजकीय रंग कमी होता, असेही त्यांनी नमूद केले.