महाराष्ट्र

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

प्रदेशाध्यक्ष पदावरून कार्यमुक्त करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. जयंत पाटील यांनी इच्छा व्यक्त करताच, राष्ट्रवादीत चक्रे फिरली आणि शशिकांत शिंदे यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : प्रदेशाध्यक्ष पदावरून कार्यमुक्त करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. जयंत पाटील यांनी इच्छा व्यक्त करताच, राष्ट्रवादीत चक्रे फिरली आणि शशिकांत शिंदे यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. दरम्यान, मंगळवार, १५ जुलै रोजी शरद पवारांच्या उपस्थितीत शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष पदाचा स्वीकारणार आहेत.

जयंत पाटील यांनी विक्रमी सात वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पाहिली होती. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी मागणी जयंत पाटील यांनी १० जून रोजी झालेल्या पक्षाच्या वर्धापनदिनी केली होती. "शरद पवार यांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत पवार यांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार यांचा आहे, त्यामुळे त्यांनी योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे," असे जयंत पाटील म्हणाले होते. त्यानंतर जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. आता मंगळवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणाऱ्या कार्यकारी समितीच्या बैठकीत याबाबतची घोषणा होणार आहे.

“प्रदेशाध्यक्ष पदाबाबत अजून नाव निश्चित नाही. शरद पवार साहेब, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. १५ तारखेला पक्षाची बैठक आहे, काही नावं चर्चेत आहेत, माझंही नाव चर्चेत आहे. ज्या वेळेला निर्णय होईल, निवड होईल त्यावेळी निश्चितपणाने काम करू,” असे शशिकांत शिंदे म्हणाले. “आणखी कुणाची नावं चर्चेत आहेत, याबद्दल कल्पना नाही. संघटनेच्या माध्यमातून पवारसाहेबांनी या महाराष्ट्रात इतिहास घडवला. काम केलं, पक्ष संघटना बांधली आहे. पक्षाच्या माध्यमातून काम करण्याच्या बाबतीत संघर्षाचा काळ आहे. त्यामुळे लोकांना अपेक्षित अशाप्रकारचे नेतृत्व पवार साहेबांनी उभं केलेलं आहे. जयंत पाटील यांच्यासारख्या अध्यक्षांनी ज्या पद्धतीनं काम केलं आहे, त्याची तुलना होऊ शकत नाही," असेही शिंदे म्हणाले.

२०१८मध्ये प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्वीकारणाऱ्या जयंत पाटील यांनी आता नव्या नेत्याच्या हाती ही जबाबदारी सोपवावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. जयंत पाटील यांनी १९९९ ते २०१४ तसेच २०१९ ते २०२२ या कालावधीत अर्थ, नियोजन, गृह आणि जलसंपदा अशा खात्यांचे मंत्री म्हणून काम पाहिले आहे. जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवांना त्यांनी वेळोवेळी पूर्णविराम दिला आहे. सध्या सत्तेवर असलेल्या महायुतीच्या सरकारमधील मंत्रिमंडळात एक रिक्त असलेली जागा जयंत पाटील यांच्यासाठी ठेवण्यात आली आहे, अशी चर्चा आहे. मात्र आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे जयंत पाटील यांनीच स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांसह विविध प्रश्नांवर काम करायचे शशिकांत शिंदे

इन कमिंग आऊट गोईंग होत असते, नवीन लोकांना संधी देणे त्यांच्याकडून नेतृत्व उभं करणं हा पवार साहेबांचा गुण आहे. कोण जातंय, लगेच यश मिळालं पाहिजे यापेक्षा, राजकीय सामाजिक चळवळीत लोक इच्छुक आहेत त्यांना पुढं आणलं तर महाराष्ट्रात बदल घडवण्याची क्षमता आहे. सत्ता बदलते दिसल्यावर बरेच लोक मार्ग बदलात. मला जर संधी मिळाली तर ते भाग्य समजेन, शरद पवार माझे दैवत आहेत. प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर आर. आर. पाटील यांच्या सारखं काम करण्याचा प्रयत्न करेन. सगळ्यात मोठं आव्हान शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं आहे. युवक वर्गाचे प्रश्न आहेत. या मुद्यांवर काम करावे लागेल, असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत

मनसे नेते ३ दिवस अज्ञातस्थळी; कपडे घेऊनच शिवतीर्थावर येण्याचे राज ठाकरेंचे नेते, विभाग प्रमुखांना आदेश