मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या सहापैकी दोन खासदारांनी उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोमवारी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
उद्धव ठाकरे यांनी २७ जुलैचा आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला. शिंदे गटात प्रवेश केलेले परभणीचे खासदार संजय जाधव आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी साेमवारी एक्स या समाजमाध्यमातून ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन केले. मात्र, जाधव यांनी एक्स या समाजमाध्यमातील पोस्ट हटवली आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेल्या ९ पैकी ६ खासदारांनी जून महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. खासदारांच्या या बंडाने ठाकरे यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतल्या होत्या.
यापूर्वी ठाकरे गटातून शिंदे गटात आलेल्या कोणत्याही आमदार किंवा खासदाराने उद्धव ठाकरे यांच्याशी आतापर्यंत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संपर्क साधण्याचे टाळले आहे. मात्र, मराठवाड्यातील दोन खासदारांनी उद्धव ठाकरे यांना आज वाढदिवसाच्या आवर्जून शुभेच्छा दिल्या.