महाराष्ट्र

Shiv Sena Symbol Dispute: सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर; आता १२ नोव्हेंबरला फैसला?

शिवसेनेच्या धनुष्यबाण या पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या वादावर आज (दि.८) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी आता महिनाभराहून जास्त काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

Krantee V. Kale

शिवसेनेच्या धनुष्यबाण या पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या वादावर (ठाकरे गट वि. शिंदे गट) आज (दि.८) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी आता महिनाभराहून जास्त काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने १२ नोव्हेंबरला निश्चित केली आहे. या याचिकेवरील सुनावणी १२ नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि आवश्यकता भासल्यास ती १३ नोव्हेंबरलाही सुरू राहू शकते, असे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने सांगितले.

...तर १३ नोव्हेंबरलाही सुनावणी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुढील वर्षी जानेवारीत होणार आहेत, त्यामुळे या प्रकरणाची लवकर सुनावणी घ्यावी, स्थानिक निवडणुकांपूर्वीच या प्रकरणावर अंतिम सुनावणी घ्यावी, अशी विनंती सिब्बल यांनी केली होती. त्यावर, “आम्ही सर्व पक्षकारांचे म्हणणे १२ नोव्हेंबरला ऐकू आणि गरज पडल्यास १३ नोव्हेंबरलाही सुनावणी सुरू ठेवू,” असे खंडपीठाने नमूद केले. शिंदे गटातर्फे वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल हजर होते.

कपिल सिब्बल यांनी स्थानिक निवडणुकांचा संदर्भ देत सुनावणी आज घेण्याबाबत आग्रह धरत अंतिम युक्तिवादासाठी ४५ मिनिटे मागितली होती. योग्य कारणासाठी आज वेळ नसल्याचे सांगत कोर्टाने तातडीने सुनावणी न घेता पुढील तारीख दिली. तसेच, निवडणुका जानेवारीमध्ये असल्यामुळे त्याआधी आपण ही सुनावणी घेऊ असेही कोर्टाने स्पष्ट केले.

दरम्यान, आज सशस्त्र दलासंदर्भात एक महत्त्वाचे प्रकरण सुनावणीला येणार असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलल्याचे समजते.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन; देशातील पहिलं ‘पूर्ण डिजिटल’ एअरपोर्ट, बघा Video

नवी मुंबई विमानतळाचे आज PM नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन; भारताच्या पहिल्या ‘पूर्ण डिजिटल’ एअरपोर्टची १० वैशिष्ट्ये

कन्फर्म तिकीट पण प्लॅन बदलला? टेन्शन नको! आता ‘डेट चेंज’ची मोफत सोय; रेल्वेचा नवा नियम

UPI वापरकर्त्यांना 'पिन'ऐवजी चेहरा, बोटाचा ठसा सक्तीचा; NPCI ची मंजुरी; आजपासून बायोमेट्रिक प्रणाली सुरू होणार

नवी मुंबई एअरपोर्टसाठी नवे इमिग्रेशन चेकपोस्ट; २८५ नवीन पोलीस पदांना मंजुरी, प्रतिनियुक्तीवर इच्छुक कर्मचाऱ्यांचे मागवले अर्ज