मुंबई : दादर-पुणे-दादर शिवनेरी वातानुकूलित बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तिकीट बुक करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली असून, प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास ती कायमस्वरूपी सुरू करण्याचा विचार करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी बसस्थानकावरील तिकीट खिडकीवर रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही.
तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये ८०९७०३००२२ हा व्हॉट्सॲप क्रमांक सेव्ह करावा आणि त्यावर ‘Hi’ असा संदेश पाठवावा. त्यानंतर व्हॉट्सॲपवर देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून प्रवासी उपलब्ध आसनांची निवड करून तिकीट आरक्षित करू शकतील.
ही सुविधा २४ सप्टेंबर ते २३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत उपलब्ध राहणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ती केवळ दादर-पुणे-दादर शिवनेरी या प्रीमियम सेवेसाठी मर्यादित ठेवण्यात आली आहे. या प्रायोगिक उपक्रमाच्या माध्यमातून प्रवाशांचा प्रतिसाद तसेच व्हॉट्सॲपवर आधारित तिकीट आरक्षण प्रणालीची कार्यक्षमता तपासली जाणार आहे.
मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरी बससेवेला मोठी मागणी असते. त्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार असून, तिकीट खिडकीवरील गर्दीही कमी होण्यास मदत होणार आहे. प्रवाशांना घरबसल्या किंवा प्रवासाच्या ठिकाणाहूनच तिकीट आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
अन्य सेवांसाठीही सुविधा लागू करणार
प्रायोगिक उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्यास एसटी महामंडळाकडून ही सुविधा दादर-पुणे-दादर शिवनेरीपुरती मर्यादित न ठेवता अन्य सेवांसाठीही लागू करण्याचा विचार केला जाणार आहे. तसेच भविष्यात व्हॉट्सॲपद्वारे तिकीट बुकिंगची सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी या प्रायोगिक कालावधीत डिजिटल तिकीट आरक्षण सुविधेचा वापर करावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.