मेघा परमार / पालघर
शिवसेना (शिंदे गट) चे ज्येष्ठ नेते आणि माजी डहाणू-तलासरी विधानसभा समन्वयक अशोक धोडी यांचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. १२ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या धोडी यांची लाल ब्रेझ्झा कार गुजरातमधील भिलाडजवळील सारीग्राम मलाफालिया येथील बंद पडलेल्या खाणीमध्ये सापडली.
पालघर पोलिसांसह पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. कार खाणीतून बाहेर काढण्यासाठी जवळपास अडीच तास लागले. कारच्या तपासणीत धोडी यांचा मृतदेह डिक्कीत आढळून आला.
कार बाहेर काढण्यापूर्वी एक काळा जॅकेट आणि पांढऱ्या रंगाचे हेडफोन घटनास्थळी सापडले. आरोपींनी पोलिसांना सांगितले की, धोडी यांची हत्या करून त्यांचा मृतदेह आणि कार खाणीत टाकण्यात आली, जेणेकरून हा अपघात असल्याचा बनाव करता येईल. तपासादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. धोडी यांच्या हत्येमागे त्यांचा स्वतःचा भाऊ किंवा जवळचा नातेवाईक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. व्यक्तिगत वाद आणि शत्रुत्वामुळे धोडी यांच्या भावानेच इतर आरोपींसह कट रचला असावा, असा संशय पोलिसांना आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनीही हीच माहिती पोलिसांसमोर दिली आहे.
चार आरोपींना अटक, तीन संशयित फरार
अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी माहिती दिली, "आम्ही कारसह मृतदेह जप्त केला आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे. सध्या चार आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित तीन संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके काम करत आहेत."
हत्या की अपघात? तपासात धक्कादायक माहिती उघड
२० जानेवारी रोजी धोडी बेपत्ता झाल्यानंतर अपहरणाचा संशय व्यक्त करण्यात आला होता. पालघर पोलिसांनी १२ दिवसांच्या सखोल तपासानंतर चार आरोपींना अटक केली. त्यांनी हत्येची कबुली दिली आहे.