मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी स्वबळावर या निवडणुका लढण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर शुक्रवारी राज्यभरातील जिल्हाप्रमुख व संपर्कप्रमुखांच्या घेतलेल्या बैठकीत त्यांनी, राज्यभर पक्षाची ताकद दाखवल्यानंतरच आपण आगामी निवडणुका स्वबळावर लढवायच्या की नाही याचा निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. तसेच त्यांनी आपल्या पक्षाच्या राज्यभरातील सर्व जिल्हाप्रमुखांना अंग झटकून कामाला लागण्याचे निर्देश दिले.
या बैठकीत काही नेत्यांनी पक्षवाढीसाठी विविध उपाययोजना सुचवल्या. त्यात काहींनी पक्षवाढीसाठी ग्रामीण भागात नेतृत्व तयार करून त्यांना सर्वाधिकार देण्याची गरज व्यक्त केली. विशेषतः राज्यभरात जाणाऱ्या संपर्कप्रमुखांचा अवाजवी हस्तक्षेप कमी करून स्थानिक नेतृत्वाला अधिक सक्षम करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या सूचनेवर उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते.
शनिवारी रात्री ८ वाजता संविधान, भारतमाता पूजन
ठाकरे गटाने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे २५ जानेवारीला रात्री ८ वाजता भारतमाता व संविधानाचे पूजन कार्यक्रमाची घोषणा केली आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २५ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता तालुका पातळीवर भारतमाता व संविधान पूजन केले जाईल. यावेळी विशेष मिरवणूकही काढली जाईल. मुंबईत शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संविधान व भारतमातेचे पूजन केले जाईल. सद्यस्थितीत संविधान व भारतमाता संकटात सापडल्याने आपण त्याच्या संरक्षणासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त हे पूजन करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.