सिंधुदुर्ग : कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव येथे प्रस्तावित असलेल्या २१०० मेगावाॅट क्षमतेच्या पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध झाल्यानंतर आता या प्रकल्पाचे सिंधुदुर्ग कनेक्शन चर्चेत आले आहे. कुडाळ तालुक्यातील आंजीवडे गाव परिसरात प्रकल्पासाठी पर्यायी जागेची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी सुमारे १०० एकर सरकारी जमिनीचा शोध घेतला जात असल्याचे समजते. या संभाव्य हालचालींमुळे सह्याद्रीच्या घनदाट जंगलावर संकट ओढवण्याची भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
आंजीवडे हे कुडाळ तालुक्याच्या पूर्व टोकाला सह्याद्रीच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य आणि दुर्गम गाव आहे. गावाची लोकसंख्या सुमारे ३०० असून ८० घरे आहेत. कुडाळच्या तहसील मुख्यालयापासून हे गाव सुमारे २५ किलोमीटर, तर जिल्हा मुख्यालय ओरोसपासून जवळपास ३० किलोमीटर अंतरावर आहे. आंजीवडे गावातून ऐतिहासिक शिवकालीन पायवाटेने किंवा आंजीवडे-पाटगाव घाटमार्गाने चार ते पाच किलोमीटर अंतर पार केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव येथे पोहोचता येते.
कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी अलीकडेच आंजीवडे परिसरात फेरफटका मारून जागेची पाहणी केल्याचे समजते. सुमारे १०० एकर सरकारी जमीन मिळविण्याच्या दृष्टीने महसूल यंत्रणेकडेही चाचपणी झाल्याची चर्चा आहे. मूळ पाटगाव प्रकल्पाच्या प्राथमिक पर्यावरणीय आराखड्यात १३९.५५ हेक्टर क्षेत्रापैकी ११६.८० हेक्टर वनक्षेत्र असल्याचा उल्लेख होता. संबंधित जंगलाचे वर्णन दाट मिश्र जंगल आणि बांबूचे वनक्षेत्र असे करण्यात आले होते.
निलेश राणे स्थानिकांसोबत
पत्रकार परिषदेत आमदार डॉ. निलेश राणे यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले. आंजीवडे येथील प्रस्तावित प्रकल्पाला गावाचा आणि स्थानिक नागरिकांचा विरोध असेल, तर स्थानिक आमदार म्हणून आपण त्यांच्या सोबत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, पालकमंत्री नितेश राणे यांची जिल्हा मुख्यालयात नियोजित पत्रकार परिषद अचानक रद्द झाल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले. ऊर्जा निर्मिती आणि साठवणूक महत्त्वाची असली, तरी त्यासाठी सह्याद्रीच्या पर्यावरणाची किती किंमत मोजावी लागणार, हा प्रश्न आता चर्चेत आला आहे.