राजन चव्हाण
सिंधुदुर्ग : अतिवृष्टी, वादळे आणि पुराचा वारंवार सामना करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला यंदा प्रथमच दुष्काळसदृश परिस्थितीचा अनुभव येत आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडणारा, नद्या-नाले, ओहोळ तुडुंब वाहणारा आणि पाणीटंचाईची फारशी चिंता नसलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्गमध्ये यंदा पावसाळा संपण्यापूर्वीच भातशेती आणि अन्य पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
१ मे १९८१ रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यानंतरच्या सुमारे ४५ वर्षांच्या काळात जिल्ह्याने अनेक वादळे, अतिवृष्टी आणि महापुरांचा सामना केला. मात्र, या नैसर्गिक संकटांमध्ये प्रामुख्याने अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान होत असे. यंदा मात्र पावसाने घेतलेली दीर्घ उघडीप, कडक उन्हाचा तडाखा आणि पाण्याच्या उपलब्धतेतील घट यामुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.
पावसाळा संपण्यापूर्वीच शेतीचे नुकसान...!
जिल्ह्यातील भातशेती ही पावसावर अवलंबून आहे. जिल्ह्यात भरपूर पाऊस पडत असल्याने शेतीला पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता कमी असते. अनेक भागांत ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरू राहतो. नद्या, नाले, ओहोळ आणि नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असते.
मार्च-एप्रिल महिन्यांमध्ये गेल्या कांही वर्षांपासून अवकाळी पाऊस येतो. परिणामी आंबा, काजू आणि अन्य फळपिकांचे नुकसान होत असते. त्यामुळे अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस हीच येथील शेतकऱ्यांसमोरील पारंपरिक आव्हाने राहिली आहेत.
मात्र, यंदा पावसाचा हंगाम संपण्यापूर्वीच त्याने दडी मारली. त्यामुळे भातपिकांसह अन्य पिकांवर संकट ओढवले आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांचे हंगामाचे गणित कोलमडले असून, शेतीच्या नुकसानीबरोबरच आगामी काळातील पाणीटंचाईची भीतीही व्यक्त होत आहे.
ऐन उन्हाळयात अवकाळी पावसामुळे आंबा, काजू आणि अन्य फळपिकांचेही नुकसान होत असते. त्यामुळे अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस हीच येथील शेतकऱ्यांसमोरील पारंपरिक आव्हाने राहिली आहेत.
मात्र, यंदा पावसाळा पूर्ण होण्यापूर्वीच पावसाने दडी मारल्याने भातपिकांसह अन्य पिकांवर संकट ओढवले आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांचे हंगामाचे गणित कोलमडले असून, शेतीच्या नुकसानीबरोबरच आगामी काळातील पाणीटंचाईची भीतीही व्यक्त होत आहे.
सिंधुदुर्गाला निसर्गचक्राचा इशारा
सिंधुदुर्गच्या नागरिकांना आजवर पावसामुळे होणाऱ्या संकटांची अधिक सवय होती. यंदा पावसाअभावी भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आणि पाणी टंचाईची शक्यता ही परिस्थिती वेगळी आहे. सिंधुदुर्गात आज दुष्काळाची चर्चा सुरू होणे, हा बदलत्या निसर्गचक्राचा गंभीर इशारा आहे. शासनाकडून पीक नुकसानीचे पंचनामे, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि संभाव्य पाणी टंचाईवर उपाययोजना याबाबत तातडीने निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
शेतीचे क्षेत्र घटले
गेल्या काही वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतीचे क्षेत्र कमी झाले आहे. अनेक ठिकाणी शेतीच्या जमिनी पडिक राहिल्या आहेत, तर काही शेतकऱ्यांनी भातशेतीऐवजी आंबा, काजू आणि अन्य फळझाडांची लागवड केली आहे.
अशा परिस्थितीत उरलेल्या भातशेतीवरही पावसाअभावी संकट ओढवल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतीचे क्षेत्र कमी होत असतानाच उपलब्ध शेतीचेही नुकसान होणे, ही जिल्ह्यासाठी चिंतेची बाब ठरत आहे.