सिंधुदुर्गात सुरू होणार आधुनिक 'फेरीबोट सेवा'; कर्ली खाडी-तारकर्ली मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर सेवा प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

सिंधुदुर्गात सुरू होणार आधुनिक 'फेरीबोट सेवा'; कर्ली खाडी-तारकर्ली मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर सेवा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंतर्गत जलवाहतूक अधिक सक्षम, गतिमान आणि सुविधायुक्त करण्यासाठी आधुनिक फेरीबोट सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर फेरीबोट सेवा सुरू करण्यात येणार आहे.

Swapnil S

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंतर्गत जलवाहतूक अधिक सक्षम, गतिमान आणि सुविधायुक्त करण्यासाठी आधुनिक फेरीबोट सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर फेरीबोट सेवा सुरू करण्यात येणार आहे. मत्स्योद्योग व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत या प्रस्तावाचा आढावा घेण्यात आला.

कर्ली खाडी-तारकर्ली मार्गावर सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर फेरीसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या रस्त्याने या भागात पोहोचण्यासाठी सुमारे दोन तासांचा कालावधी लागतो. फेरीसेवा सुरू झाल्यास हा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून, सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

मंत्री नितेश राणे यांनी मार्ग निश्चित करण्यापूर्वी जेटींची उपलब्धता, प्रवाशांच्या चढ-उताराची व्यवस्था, पाण्याची खोली तसेच प्रवासी आणि वाहनांची संभाव्य मागणी याबाबत सविस्तर सर्वेक्षण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. फेरीबोट सेवा प्रत्यक्षात सुरू झाल्यास सिंधुदुर्गातील जलवाहतुकीला आधुनिक आणि वेगवान पर्याय उपलब्ध होणार आहे.

पाच संभाव्य मार्गांचा विचार

या प्रकल्पासाठी सुरुवातीला कर्ली खाडी-तारकर्ली, कर्ली खाडी-मोबार-देवबाग, देवबाग-निवती, विजयदुर्ग-अणसुरे-दांडे आणि आरोंदा-किरणपाणी या पाच संभाव्य मार्गांचा विचार करण्यात आला आहे. अंतिम मार्ग निश्चित करण्यापूर्वी संबंधित मार्गांवरील जेटींची उपलब्धता, पाण्याची खोली, प्रवासी व वाहनांची मागणी तसेच अन्य तांत्रिक बाबींचे सविस्तर सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

एका फेरीबोटीच्या बांधणीसाठी चार कोटींचा खर्च

प्रस्तावित फेरीबोट सुमारे २० मीटर लांब आणि ७.५ मीटर रुंद असणार आहे. या फेरीबोटीत प्रवाशांसह चारचाकी आणि दुचाकी वाहून नेण्याची क्षमताही असणार आहे. एका फेरीबोटीच्या बांधणीसाठी सुमारे चार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. फेरीबोटीचे बांधकाम शिपयार्ड किंवा सक्षम संस्थेमार्फत निर्धारित तांत्रिक निकषांनुसार करण्यात येणार आहे. फेरीसेवेच्या संचालनासह मनुष्यबळ आणि देखभालीची जबाबदारी संबंधित ऑपरेटरची राहणार आहे. तर मार्ग, वेळापत्रक आणि भाडे यांसारख्या महत्त्वाच्या बाबींवर शासनाचे नियंत्रण राहणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Navi Mumbai : महापालिका पदभरती निकालाचा मार्ग मोकळा; संवर्गाचे स्कोअर कार्ड संकेतस्थळावर होणार जाहीर

Thane : खारफुटीतील भराव तात्काळ थांबवा! पोलीस आयुक्तांना NGT चा दणका, जिल्हाधिकाऱ्यांनाही फटकारले

Ulhasnagar : 'मी आमदार आहे, नगरसेवकाला विचारण्याची गरज नाही'; गोलमैदानातील विकासकामावरून आयलानी-पांडे आमनेसामने

Thane : गणेशोत्सवात अवजड वाहनांना 'नो एंट्री' विसर्जनाच्या पाच दिवसांत शहरात प्रवेशबंदी

IPO आक्रसणार; एनएसईसाठी भागधारकांनी घेतली माघार; सर्वात मोठ्या आयपीओचा विक्रम हुकणार